कोपर्डे हवेली : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून भाजीपाल्याला बाजारपेठेत दर नाही. काही दिवसांत दर वाढतील, या अपेक्षेवर शेतकरी होते. मात्र, शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. दरात कोणतीही सुधारणा होत नसल्याने अखेर तोटा सहन करून शेतकरी माळव्याच्या पिकांची झाडे काढून टाकत आहेत. सध्या बाजारात वांगी पाच रुपये किलो एवढ्या नगण्य किमतीत तर टोमॅटो अक्षरश: फुकट वाटला जात आहे. तरीही ग्राहक मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकरी शेतात कमी अवधीत जादा पैसे मिळवून माळव्याची पिके घेत असतात; पण सध्या भाजीपाल्याची शेती दराअभावी तोट्यात जाऊ लागली आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून भाजी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, तोटा सहन करावा लागत आहे. नोटाबंदीचा काही अंशी दरावर परिणाम झाला असून, बाजारपेठेत अतिरिक्त भाजीपाल्याची आवक होत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री कवडीमोल दराने करावी लागत आहे.कोपर्डे हवेली परिसरात अनेक शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतात. कोपर्डे हवेली येथील शेकरी दत्तात्रय पाटील यांची टोमॅटोची तीस गुंठे बाग होती. त्यांना कमी दराचा फटका बसला असून, एक लाखाचे नुकसान झाल्याने ऐन भरात आलेली बाग त्यांनी फळासह काढून टाकली आहे. तर वांगी उत्पादक शेतकरी भीमराव चव्हाण यांचे वांग्याचे शेत कऱ्हाड-मसूर रस्त्यालगत आहे. दर नसल्याने त्यांनी रस्त्यावर उभे राहून प्रवाशांना वांगली फुकट दिली. मात्र, तरीही कोण वांगी घेत नसल्याने त्यांनी बागच उपटून टाकली. पाच रुपये किलो वांग्याचा दर आहे. तिच परिस्थिती टोमॅटो पिकाची झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी झाडे काढून शेत रिकामे करीत असल्याचे दिसते. (वार्ताहर)सर्वच भाजीपाला कवडीमोल दरातसध्या बाजारात सर्वच भाजीपाल्याचे दर उतरले आहेत. त्यामुळे शेतकरी घायकुतीला आले आहेत. मेथीचा सध्याचा शेकड्याचा दर ३०० ते ४०० रुपये, कोथिंबीर शेकडा ५०० ते ६००, चाकवत ३०० ते ४००, पालक २०० ते ३००, टोमॅटो १ ते १.५ रुपये प्रतिकिलो, कोबी ४ ते ५ रुपये, फ्लॉवर ५ ते ६ रुपये, वांगी ५ ते ६ रुपये, गवारी ३० ते ३२ रुपये तर पावटा १८ ते २० रुपये किलोने विकला जात आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही.
वांगी पाच रुपयात; तर टोमॅटो फुकटात !
By admin | Published: December 27, 2016 1:00 AM