मलटण : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झिरपवाडी (ता. फलटण) जुन्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत तातडीने दुरुस्त करून घेऊन त्याचा वापर कोरोना उपचार केंद्रासाठी करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
कोरोनाची पहिली लाट सुरू झाल्यानंतर हे ग्रामीण रुग्णालय सुरू करावे म्हणून पुन्हा मागणी केली. त्या वेळी झिरपवाडी येथील ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय झाला होता. या बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार दीपक चव्हाण तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. परंतु सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला दिसून येत नाही.
सध्या शहरातील वैद्यकीय सेवा-सुविधा पुरेशा नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ग्रामीण रुग्णालय इमारतीची तातडीने दुरुस्ती करून घेऊन तेथे कोरोना उपचार केंद्र तातडीने उभे करण्याची आवश्यकता होती. मात्र गेले सात ते आठ महिने केवळ त्याच्या दुरुस्ती-देखभालीचे आराखडे, अंदाजपत्रक करण्यात येत असल्याचे सांगून इमारत पुन्हा एकदा दुर्लक्षित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त करीत इमारतीसाठी करण्यात आलेले आराखडे, अंदाजपत्रक तातडीने मंजूर करून इमारतीत कोरोना उपचार केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी दशरथ फुले यांनी केली आहे.
इमारत गेली २०-२५ वर्षे दुर्लक्षित राहिल्याने इमारतीची दारे, खिडक्या अज्ञाताने काढून नेली असून, अन्य नुकसानही झाले आहे. मुख्य इमारत तातडीने दुरुस्त करून तेथे आगामी सप्ताहात कोरोना उपचार केंद्र सुरू करावे; अन्यथा मोर्चा, उपोषण, आत्मदहनसारखे आंदोलन करण्याचा इशारा दशरथ फुले यांनी दिला आहे.
===Photopath===
140521\img-20210514-wa0185.jpg
===Caption===
झिरपवाडी येथील अनेक वर्षे वापरावीना पडून असलेली ग्रामीण रुग्णालयाची इमारत