सातारा : आधुनिक संचार माध्यमांच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या टपाल खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी मंगळवारपासून (दि. १२) देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात राज्यातील वीस हजार व सातारा जिल्ह्यातील सर्व डाकसेवक सहभागी झाले आहेत. या संपामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागातील डाक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सातारा विभागीय सेक्रेटरी राजकुमार चव्हाण व कऱ्हाड विभागीय सेक्रेटरी जयवंत शिर्के यांनी दिला. ग्रामीण भागातील डाक सेवकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कामाची वेळ आठ तासाची असून त्यांना चार तासाचेच वेतन मिळत आहे. संघटनेच्या वतीने जीडीएस कर्मचाऱ्यांना आठ तासाचे काम देऊन नियमित कर्मचारी म्हणून घोषित करावे, २०१६ रोजीच्या कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यात, विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, टीए, डीए, पेन्शन, वैद्यकीय सुविधा, शिक्षण भत्ता सुविधा लागू कराव्यात, इंडीया पोस्ट पेमेंट बँकेचे काम कमिशन ऐवजी वर्कलोडमध्ये सामाविष्ट करण्यात यावे, अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत केंद्रशासन वेळ काढूपणा करत असल्याने संघटनेने देशव्यापी संप पुकारला असून, सातारा जिल्ह्यातील डाक सेवक या संपात सहभागी झाले आहेत. साताऱ्यातील पोवई नाक्यावर असलेल्या मुख्य टपाल कार्यालयाबाहेर टपाल सेवकांकडून मंगळवारी दुपारी जोरदार घोषणा देण्यात आल्या. या संपामुळे ग्रामीण भागातील बचत खाते भरणा, स्पीड बुकिंग वाटप, मुलाखत पत्र, मनीऑर्डर सेवा, रजिस्ट्री पत्र, आरडी, वीज बिल भरणा, सुकन्या योजनेचे काम ठप्प झाले आहे.
साताऱ्यातील ग्रामीण डाकसेवक संपावर; टपाल सेवा, आर्थिक व्यवहार ठप्प
By सचिन काकडे | Published: December 12, 2023 5:17 PM