चाफळ : गेल्या अनेक वर्षांपासून जाळगेवाडी ता. पाटण येथील ग्रामस्थांना स्वस्त धान्य मिळवण्यासाठी पायपीट करावी लागत होती. जाळगेवाडीचे सरपंच शिवाजी काटे, ग्रामपंचायत सदस्य व अध्यक्ष भरत साळुंखे यांनी गावातच स्वस्त धान्य दुकान मंजूर करुन आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. यापुढे गावातच रेशनिंग मिळणार असल्याने ग्रामस्थांची पायपीट थांबणार आहे.
जाळगेवाडी यथील पूर्वीच्या रेशनिंग दुकान परवानाधारकांनी राजीनामा दिल्याने ग्रामस्थांना चाफळ येथे असलेल्या स्वस्त धान्य दुकानामधून रेशनिंगचे धान्य आणावे लागत होते. यासाठी ग्रामस्थांना चार किलोमीटरची पायपीट करत दिवसभर रखडून रेशनिंग मिळवावे लागत होते. याबाबत येथील ग्रामस्थांनी संजय गांधी निराधार योजनेचे पाटण तालुकाध्यक्ष भरत साळुंखे, सरपंच शिवाजी काटे यांच्याकडे गावातच रेशनिंग मिळावे अशी मागणी केली होती. दरम्यान, जाळगेवाडीचे सरपंच शिवाजी काटे, ग्रामपंचायत सदस्य यांनी गावातच स्वस्त धान्य दुकान मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पाटण येथील पुरवठा अधिकारी अष्टेकर यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. ग्रामपंचायतीच्या नावे रेशनिंग दुकानाचा परवाना दिला आहे. यापुढे जाळगेवाडीकरांना गावातच रेशनिंग धान्याचे वितरण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जाणार आहे. जाळगेवाडी ग्रामस्थांना दर महिन्याला शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे धान्य वितरण करणार असल्याचे सरपंच काटे यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या नावावर स्वस्त धान्य दुकान मंजूर झाल्याने आत्ता गावातच धान्य मिळणार असल्याने ग्रामस्थांची चार किलोमीटरची पायपीट थांबली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जाळगेवाडी येथील ग्रामस्थांना चाफळ गावात असलेल्या स्वस्त धान्य दुकानातून रेशनिंगचे धान्य दर महिन्याला घेऊन जावे लागत होते. यासाठी ग्रामस्थांना दिवसांचा रोज बुडवून दिवसभर नंबरला थांबून रेशनिंगचे धान्य घ्यावे लागत होते. आता गावातच रेशनिंगचे धान्य मिळणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.