तळमावले : पाटण तालुक्यात काळगाव विभागात सध्या पेरणीची धांदल सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतीशिवार माणसांनी गजबजून गेला आहे.एरव्ही उन्हाळ्यातच धूळवाफेवरील पेरणी केली जाते. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, मका आदी पिके घेतली जातात. परंतु यावेळी धूळवाफेवरील पेरणी झाली नाही. यंदाच्या उन्हाळ्यात वळिवाचा मोठा पाऊस या विभागात झाला नाही. त्यामुळे मशागतही चांगली झाली नाही. काही दिवसांपूर्वी तौक्ते वादळामुळे आलेल्या पावसामुळे या परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे युध्दपातळीवर सुरू केली आहेत.
नांगर, कुळव, पाटे, कुरी, बांडगे आदी पारंपरिक शेती औजारांच्या साहाय्याने शेतकरी शेती करत आहेत. क्वचितच ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. बहुतांशी गावांत बैलजोड्या कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे पेरणी करत असलेल्या बैल मालकांकडून आपली शेती प्रथम पेरून घेण्याची गडबड सुरू आहे.यावेळी नेहमीपेक्षा जास्त क्षेत्र पेरले जाण्याची शक्यता आहे.
गतवर्षीप्रमाणे लॉकडाऊनमुळे पुणे, मुंबई या ठिकाणी असणारी बहुतांशी मंडळींनी शेतीमध्ये मेहनत घेतली आहे. ज्या शेतात कधीही मशागत केली जात नव्हती. किंवा कामाधंद्यानिमित्त अन्यत्र असलेल्या लोकांनी शेतीकडे दुर्लक्ष केले होते त्या लोकांनीही यावेळी शेतीमध्ये पेरणी करण्यास प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. ह्यगड्या आपला गावच बराह्ण असे म्हणत या लोकांनी शेतीमध्ये आपला वेळ दिला आहे.
पेरणीमुळे सर्व लोक शेतामध्ये दिसत आहे. सर्व शिवार माणसांनी फुलून गेला आहे.काळगाव विभागातील डाकेवाडी, लोटळेवाडी, येळेवाडी, करपेवाडी, मस्करवाडी, चोरगेवाडी, वेताळ, निवी, सलतेवाडी, मत्रेवाडी आदी वाड्या-वस्त्यांवर सध्या पेरणीची लगीनघाई सुरू असल्याचे दिसून येत आहे.