कºहाड : प्रतीक्षा प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण झाली; पण ही श्रेणी तिला सहजासहजी मिळाली नाही. शिक्षणासाठी तिनं काळी माती कालवली. कधी-कधी चिखलात नखशिखांत ती भरली. त्या मातीतून तीन सुबक वस्तू घडवल्या आणि त्या वस्तू घडवताना परिस्थितीनं तिलाच घडवलं.
प्रतीक्षा कुंभार. चिखलातून वस्तू बनविणारी कष्टाळू विद्यार्थिनी. प्रतीक्षा ही कुंभार समाजाची. परंपरागत व्यवसाय करणाऱ्या सामान्य कुटुंबातली. मात्र, या सामान्य कुटुंबात राहूनच तिने यशाला गवसणी घातली. दहावीत तिने ८२.६० टक्के गुण मिळविले. कार्वे नाक्यावर प्रतीक्षासह तिची आई लता, बहिणी मनाली, राखी आणि गायत्री हे राहतात. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात या कुटुंबावर आभाळ कोसळलं. प्रतीक्षाचे वडील भाऊसाहेब हे या कुटुंबाला सोडून गेले. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. वडील रुग्णालयात दाखल होते, त्यावेळी प्रतीक्षाची दहावीची परीक्षा सुरू होती. अचानक ओढवलेल्या या संकटातून सावरायलाही वेळ नव्हता. परीक्षा फक्त प्रतीक्षाची नव्हती. संपूर्ण कुटुंबच त्यावेळी परीक्षा देत होतं. मात्र, तरीही प्रतीक्षाने धिर सोडला नाही. वडील, आई आणि बहिणींच्या पाठबळामुळे तिने तिचा अभ्यास सुरूच ठेवला. वडिलांची काळजी. घरातील काम आणि त्यातच परीक्षेचा ताण. अशा परिस्थितीतही प्रतीक्षा डगमगली नाही. परीक्षा संपताच आई आणि बहिणींसोबत ती वडिलांच्या सेवेला लागली. मात्र, भाऊसाहेब कुटुंबाला सोडून गेले.
पारंपरिक कुंभारकाम हे प्रतीक्षाच्या कुटुंबीयांचे आर्थिक साधन. सुरुवातीपासूनच प्रतीक्षाही त्यामध्ये रुळली. मातीपासून बेंदूर सणाचे बैल, संक्रांती, नागपंचमीचे नागोबा आदी वस्तू ती बनवते. पाचवीत असल्यापासून बहिणींसोबत तिने ही कला अवगत केली. आणि बनविलेल्या वस्तू रस्त्यावर बसून विकण्यासही ती कधी लाजली नाही.ऋतिकाची भरारीवारुंजी येथील ऋतिका अरूण पाटील या विद्यार्थिनीनेही दहावीत उत्तुंग यश मिळविले. तिला ९५.४० टक्के गुण मिळाले आहेत. ऋतिकाचे वडील शेतकरी आहेत. तर आई गृहिणी. मिळेल त्या शैक्षणिक साधनांचा उपयोग करून तिने यश मिळविले.
कुटुंब शेतकरी असलं तरी शिक्षणाबाबत घरातील सर्वजण आग्रही आहेत. मला माझ्या प्रत्येक निर्णयात कुटुंबीयांनी पाठबळ दिले. दहावीत प्रवेश घेतल्यापासून मी अभ्यासाचे नियोजन केले होते. त्या नियोजनामुळेच परीक्षेत कोणताही प्रश्न अवघड वाटला नाही. लोकसेवा, राज्यसेवा परीक्षा देऊन मला अधिकारी व्हायचंय.- ऋतिका पाटील, वारुंजी, ता. कºहाड
कुंभार काम करून मिळालेल्या पैशातून घर आणि शाळेचा खर्च भागविण्याचा बहिणींसह मी प्रयत्न केला. याच कष्ट आणि प्रयत्नांमुळे आज मला हे यश मिळवता आले. माझ्या बहिणीही सध्या शिक्षण घेतायंत. मलाही शिकून भविष्यात पोलीस अधिकारी व्हायचंय. माझ्या या यशात कुटुंबीय आणि शिक्षकांचा मोठा वाटा आहे.- प्रतीक्षा कुंभार, कार्वे नाका-कºहाड