कोल्हापूर : जिल्हा दौºयावर आलेल्या कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांची बुधवारी दुपारी एकच्या सुमारास शासकिय विश्रामगृह येथे अचानक तब्येत बिघडून चक्कर आली. यामुळे खळबळ उडाली. तात्काळ परिसरातील खासगी इस्पितळातील सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांच्या पथकासह या ठिकाणी दाखल झाली. सदाभाऊंवर उपचार झाल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली. यानंतर ते पुढील कार्यक्र्रमासाठी रवाना झाले.
नवीन शेतकरी संघटनेच्या स्थापनेची घोषणाचा बुधवारी शाहू स्मारक भवन येथे आयोजित केला होता. यासाठी मंत्री खोत सकाळी साडे अकराच्या सुमारास शासकिय विश्रामगृह येथे दाखल झाले. येथील सिंहगड सुटमध्ये मंत्री खोत उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
कार्यकर्त्यांशी संवाद सुरु असतानाच दुपारी एकच्या सुमारास त्यांची अचानक तब्येत बिघडून चक्कर आली. त्यामुळे उपस्थितांची तारांबळ उडाली. काही जणांनी कदमवाडीतील एका खासगी इस्पितळातील डॉक्टरांशी संपर्क साधला.
काहीवेळातच सुसज्ज रुग्णवाहीकेसह डॉक्टरांचे पथक दाखल झाले. त्यांनी मंत्री खोत यांची तपासणी करुन उपचार केले. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना काही वेळ विश्रांती घेण्याविषयी डॉक्टरांनी सांगितले. त्यानुसार जवळपास तासभर मंत्री खोत यांनी विश्रांती घेतली. यानंतर दुपारी दोनच्या सुमारास ते अंबाबाई दर्शनासाठी रवाना झाले.