पाचवड : आनेवाडी टोलनाक्यावर ट्रकच्या चाकाखाली सापडून सफाई कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.हैबत दत्तोबा मोरे (वय ५५, रा. मोरेवाडी, ता. जावळी) असे सफाई कामगाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हैबत मोरे हे गेल्या काही महिन्यांपासून आनेवाडी टोलनाक्यावर सफाई कामगार म्हणून काम करत होते. सोमवारी नेहमीप्रमाणे ते सकाळी आठ वाजता कामावर आले. हातात झाडू घेऊन ते टोलनाक्यावर साफसफाई करू लागले.
टोल क्रमांक सातवर ते स्वच्छता करत असताना तेथून हा ट्रक (केए २५ ए ९४३८) जात होता. याचवेळी मोरे हे तेथून जात असताना ट्रकचा धक्का लागून ते रस्त्यात पडले. ते खाली पडल्याचे ट्रक चालकाच्या निदर्शनास न आल्याने त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हैबत मोरे हे ट्रकखाली सापडल्याचे काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत ट्रक त्यांच्या अंगावरून पुढे गेला होता.
घटनास्थळाचे दृष्य अत्यंत विदारक होते. रक्ताचा सडा पडलेला पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला. या अपघातानंतर ट्रक चालकास भुईंज पोलिसांनी अटक केली असून, हैबत मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भुर्इंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आला. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. हवालदार बापुराव धायगुडे हे पुढील तपास करीत आहेत.अन्यथा अनर्थ टळला असता..ज्या लेनवर हा अपघात झाला. ती लेन फास्ट ट्रॅक लेन म्हणून वापरली जाते. या ट्रॅकवरून जाणारी वाहने टोलचे पैसे देण्यासाठी थांबत नाहीत तर त्यांचे पैसे त्यांच्या खात्यातून जमा होत असतात. त्यामुळे या ट्रॅकवरील वाहने काही सेकंदातच टोलनाक्यावरून पुढे जात असतात. अशा ट्रॅकची साफसफाई करीत असताना तो ट्रॅक वाहनांसाठी बंद करण्यात आला असता तर हैबत मोरेला आपला जीव गमवावा लागला नसता, असे बोलले जात आहे. अत्यंत हालाखीची परिस्थिती असणारे हैबत मोरे यांचे कुटुंबीय त्यांच्या मृत्यूमुळे दु:खाच्या गर्तेत सापडले आहे.