वाठार निंबाळकर , दि. २४ : ढवळ, ता. फलटण येथील शिंदेमळा तलाव १९७२ पासून कधीही दुरुस्त केला नाही. या तलावाच्या भरावाच्या भिंती जीर्ण झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. त्यातच तलावाच्या आतील व बाहेरील बाजूला वेड्या बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात उगवून आल्याने या बाभळीच्या मुळ्या खोलवर जाऊन त्यामुळे अचानक तलाव फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ढवळ परिसरातील परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात हे पाझर तलाव, नालाबांध बंधारे भरून वाहत असून, त्या वाहणाऱ्या पाण्याने आजही शिंदेमळा तलावात पाणी येत आहे.
या तलावालगत शिंदेमळा नावाची लोकवस्ती असून, तलावाच्या जीर्ण भिंती तसेच मोठ-मोठ्या बाभळी आहेत. यामुळे तलाव फुटण्याच्या भीतीमुळे या वस्तीतील ग्रामस्थ जीव मुठीत धरून रात्र काढत आहेत.
या तलाव दुरुस्तीबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सावंत यांच्याशी संपर्क साधला असता तलाव दुरुस्तीसाठी निधी नसून तांत्रिक विभागाची मशिनरी मागवून तलाव दुरुस्ती करू, असे सांगितले.
दरवर्षी पाऊस झाला की तलाव भरतो. आम्ही संबंधित विभागाकडे दुरुस्तीची विनंती करतो. समजुतीसाठी अधिकारी येतात. पण दुरुस्ती होत नाही. नेमके या विभागाची काय अपेक्षा आहे? हे समजत नाही. रात्रभर जीव मुठीत धरून आयुष्य जगावे लागत आहे.- दादा शिंदे,ग्रामस्थ, शिंदेमळा
ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला वारंवार निवेदन, मागणी पत्र, दिले आहे. मात्र, हलगर्जीपणा केला जात आहे. येत्या १० दिवसांत दुरुस्ती न सुरू झाल्यास ग्रामस्थ तीव्र स्वरुपाचे आंदोलन करतील.- उषा लोखंडे,सरपंच, शिंदेमळा.