प्रमोद सुकरे -- कऱ्हाड दक्षिणेतील रेठऱ्याच्या मनोमिलनातील एका ‘डॉक्टर’ पुतण्याने गत आठवड्यात आपल्या एका ‘काका’ ला आता तुम्ही ‘राजकीय सन्यास घ्या’ असा जाहीर सल्ला दिला होता. तर त्या पाठोपाठ उंडाळेच्या ‘वकील’ पुतण्याने आपल्या काकांना ‘हात’ दाखवित राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केल्याने हे दोन्ही पुतणे सध्या चर्चेत आहेत. डॉक्टर पुतण्याचं इंजेक्शन काकांना दुखलं की नाही समजत नाही; पण वकील पुतण्यानेच काकांना ‘सोडचिठ्ठी’ दिल्याने ज्येष्ठ वकील ‘काकां’ची आगामी राजकारणात नेमकी काय भूमिका राहणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. खरंतर कृष्णा काठावर जशी ‘भाऊ आप्पांची’ जोडी ‘राम लक्ष्मणा’ची जोडी म्हणून ओळखली जायची तशीच दक्षिण मांड नदी काठावर ‘काका’ अन् ‘बापूं’ची जोडीही ओळखली जायची. या भावाभावांच्या प्रेमाच्या सुरस कथा आजही ऐकायला मिळतात; पण जे रेठऱ्यात घडलं तेच आज उंडाळ्यात घडत आहे. रेठऱ्यातलं ‘रामायण’ सगळ्यांना तोंडपाठ झालंय त्यामुळे उंडाळेच्या ‘रामायणा’ची सध्या चर्चा आहे. उंडाळेतील ‘सिंह’ अन् ‘राव’ या दोन वकील बंधंूच्यात तेवढं सख्य नव्हते. याची कार्यकर्त्यांना अनेकदा प्रचिती येतच होती; पण ‘घरोघरी मातीच्या चुली’ या म्हणीप्रमाणे सगळे त्याकडे पाहत होते. काका बापूंनी जसं एकमेकांना समजावून घेतले त्याप्रमाणेच ही पुढची पिढीही हळूहळू समजावून घ्यायला शिकेल, अशी आशा होती पण ती फोल ठरली. विलासकाकांच्या नावापुढे उंडाळकर हे गावाचे नाव लावल्यामुळे या गावाची महती सर्वदूर पोहोचली आहे. बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा उंडाळेत स्थापनेपासून चालत आलेली. इथला कारभार ज्येष्ठ बंधू जयसिंगराव पाटील बापूच हाकत आलेले, पण गत ग्रामपंचायत निवडणुकीत अॅड. उदयसिंह विलासराव पाटील मित्र परिवाराने ही निवडणूक लावली. तब्बल ५0 वर्षांनंतर झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत जयसिंगराव पाटील बापू अॅड. आनंदराव पाटील यांच्या पॅनेलला ६ जागा मिळाल्या तर अॅड. उदयसिंह पाटील मित्र परिवाराला ३ जागा मिळाल्या. यात कोण जिंकलं अन् कोण हरलं याची चर्चा तालुकाभर रंगली. त्यानंतर इतर अनेक संस्थांच्या निवडणुकाही अशाच रंगतील, अशी शक्यता वर्तवली जात होती; पण दोघांनीही सबुरी घेतली अन् विकास सेवा सोसायटी, शामराव पाटील पतसंस्था अन् रयत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. उंडाळकर समर्थकांनी जणू सुटकेचा निश्वास सोडला; पण रयत साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी जयसिंगराव पाटील यांच्या ऐवजी अॅड. उदयसिंह पाटील यांची निवड झाली. अन् पुन्हा अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गत दोन महिन्यांपूर्वी कऱ्हाडात उंडाळकर भोसले मैत्रिपर्वाने गेल्या वर्षभरात विविध संस्थांच्या जिंकलेल्या निवडणुकीतील नव्या कारभाऱ्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित केला होता. पण त्यात ‘रयत’ च्या कारभाऱ्यांचा उल्लेख नव्हता अन् त्या कार्यक्रमाला जयसिंगराव पाटील व अॅड. आनंदराव पाटील उपस्थितही नव्हते. या व अशा अनेक घडामोडी समोर येत असताना उंडाळकरांच्या कुटुंबात काहीतरी गडबड आहे, हे कार्यकर्त्यांनाही जाणवत होतेच. दबक्या आवाजात तशी चर्चा पण होत होती. पण या अंतर्गत कलहावर काका चुटकीसरशी उपाय शोधतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. पण गेले दीड-दोन वर्षे या ना त्या कारणाने रबरासारखे ताणलेले हे नाते आता अॅड. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेने तुटल्याचे स्पष्ट होत आहे. चार आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता उंडाळे मुक्कामी होणाऱ्या जाहीर प्रवेश कार्यक्रमाला हजर राहताना उंडाळकर समर्थकांना तारेवरची कसरत करावी लागणार हे निश्चित ! (समाप्त)फायदा कुणाचा, तोटा कुणाचा!अॅड. आनंदराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेमुळे कऱ्हाड दक्षिणेत राजकीय फायदा आणि तोट्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अॅड. पाटील यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला फायदा तर होईलच; पण तो किती होईल, हे आज स्पष्टपणे सांगता येत नाही. पण विधानसभा निवडणुकीतील पराभवाने अगोदरच अडचणीत आलेल्या विलासराव पाटील-उंडाळकर यांना या घरच्या वादळाचा तोटा मोठ्या प्रमाणात होईल, असे जाणकारांचे मत आहे.आनंदराव पाटील यांचे अचुक ‘टायमिंग’कोणताही निर्णय घ्यायला काळ आणि वेळ जुळून यायला लागते. उंडाळकर बंधूंतील गेली दोन वर्ष सुरू असणाऱ्या सुप्त संघर्षाला अखेर गणेश विसर्जनाच्या दिवशी मोकळी वाट मिळाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुतणे अॅड. आनंदराव पाटील यांनी काकांना ‘हात’ दाखवत पितृपंधरवड्याच्या अगोदरचा हा मुहूर्त साधत राष्ट्रवादीच्या घडाळ्याकडे बघत अचुक ‘टायमिंग’ साधल्याची चर्चा आहे.मला स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांचा वारसा आहे. तर वडील ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील ऊर्फ बापू यांचे मार्गदर्शन आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची आपणाला मदत होईल, अशी खात्री पटली. म्हणूनच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन दोनदा चर्चा झाली. कार्यकर्ते व कुटुंबीयांना विश्वासात घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. - अॅड. आनंदराव पाटील-उंडाळकर
पुतण्याची ‘सोडचिठ्ठी’; ‘काकां’च्या भूमिकेकडे लक्ष!
By admin | Published: September 17, 2016 10:39 PM