कराड :
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे. गुरुवारी निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. शुक्रवारी (दि. १८) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर चिन्हवाटप झाले. त्यात अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी सहकार पॅनलला ‘कपबशी’, रयत पॅनलला ‘शिट्टी’, तर संस्थापक पॅनलला ‘नारळ’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रचाराला गती प्राप्त होणार आहे.
अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांत कारखान्याचे सत्तेचाळीस हजारांवर ऊस उत्पादक सभासद विखुरलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. स्थानिक नेत्यांचा निवडणुकीत कस लागणार आहे.
सध्या कारखान्यात डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलची सत्ता आहे, तर माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व त्यांचे सहकारी विरोधी बाकावर आहेत. डॉ. भोसले हे भाजपशी संबंधित आहेत, तर अविनाश मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. भाजपशी संबंधित लोकांच्या ताब्यात कारखान्याची सत्ता असल्याची सल काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्या मनात होती व आहे. त्यामुळे सत्ताधारी भोसले यांना रोखण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू होते व आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून डॉ. सुरेश भोसले यांना रोखण्यासाठी त्यांचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या डॉ. इंद्रजित मोहिते यांचे रयत पॅनल व अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनल यांच्यात मनोमीलनाचे बरेच प्रयत्न झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी स्वतः यासाठी पुढाकार घेतला. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणापर्यंत हे मनोमीलन होईल व कारखान्यात दुरंगी सामना पहायला मिळेल अशी काहींना अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात तिरंगी लढतच निश्चित झाली आहे.
दरम्यान, निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशीच डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनलच्या वतीने पहिला अर्ज दाखल केला गेला होता. त्यावेळी कपबशी या चिन्हाला पसंती दिली होती. त्यानंतर अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलने अर्ज दाखल करीत नारळ चिन्हाला प्राधान्य दिले होते. तर रयत पॅनलने अर्ज दाखल करून शिट्टी चिन्ह मागितले होते. या तिघांचाही अपेक्षेप्रमाणे त्यांना निवडणूक चिन्ह मिळाले असून ते आता प्रचाराला लागले आहेत.
चौकट
अपक्षांच्या हाती फोन, पतंग अन् रिक्षा...
कारखान्याच्या निवडणूक रिंगणात तीन अपक्ष उमेदवारही आहेत. त्यांनाही शुक्रवारी चिन्हवाटप करण्यात आले. शंकर कारंडे (विमुक्त जाती-जमाती) फोन, कांचन जगताप (महिला राखीव) पतंग, प्रमोद पाटील (काले आटके गट) ऑटोरिक्षा असे निवडणूक चिन्ह त्यांना देण्यात आले आहे.