लोकमत न्यूज नेटवर्क
साहेब लय वर्षांनंतर लग्नासाठी पोरीचे स्थळ आलंय, बघायला निघालो आहे. पोरगी पसंत पडली की लगीनच करून परतणार आहे. तरी कृपया मला सांगलीकरिता ई-पास द्या नाहीतर माझे लय अवघड होईल, हे वाक्य ऐकून कोणालाही वाटेल एखादा तरुण लग्नाकरिता वेडा तर झाला नाही ना, पण अशी मनोरंजनात्मक अनेक कारणे देत सातारा जिल्ह्यात तब्बल ५१ हजार ८९४ ई-पासकरिता आलेले अर्ज नामंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाबंदीचा २३ एप्रिल २०२१ रोजी आदेश लागू झाल्यानंतर अत्यावश्यक कारणांसाठीच प्रवास करणे बंधनकारक असल्याने सातारा जिल्ह्यात ८ जून २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये सातारकरांनी विविध कारणांसाठी तब्बल १ लाख ६ हजार ८०५ ई-पासकरिता अर्ज दाखल केले.
कोरोनाची लढाई युध्दपातळीवर लढत नागरिकांना अहोरात्र अत्यावश्यक सेवा मिळणेसाठी पोलिसांनी योगदान दिले. यामध्ये सातारकरांनी विविध कारणांसाठी तब्बल १ लाख ६ हजार ८०५ ई-पासकरिता अर्ज दाखल केलेल्यांपैकी ५४ हजार ९११ वैध अर्ज मंजूर करण्यात आले आहे. याकरिता सर्व अधिकृत अत्यावश्यक कारणांकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे आॅनलाइनद्वारे दाखल केल्यानंतरच त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयामध्ये जाणेसाठी, अंत्यविधीला जाणेसाठी, शासनाने दिलेल्या नियमानुसार आयोजित लग्नसमारंभ अशा असलेल्या कारणांकरिता जाणाऱ्या संबंधितांना सातारा जिल्ह्याबाहेर अत्यावश्यक कारणांकरिता जाता आले. त्याचप्रमाणे प्रामुख्याने इतर जिल्ह्यामध्ये रहिवाशी आहे, परंतु तेथील जिल्ह्यातून ई-पास मिळत नाही तर सातारा जिल्ह्यातून ई-पास मिळतोय, असे ऑनलाईन केलेले अर्ज, अवैध कागदपत्रे, अपूर्ण कागदपत्रे, अत्यावश्यक कारण नसलेले तब्बल ५१ हजार ८९४ अर्ज नामंजूर करण्यात आले.यामध्ये एका शेतकऱ्यांच्या मुलाने ई-पासकरिता दिलेले कारण अतिशय रंजक असून साहेब,शेताला पाणी पाजायला जायचे आहे माझे वावर सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे,आपल्याला खोटे वाटत असल्यास तुमचा माणूस पाठवून खात्री करा नाहीतर माझे वावराचे वाटोळे होईल. कृपया मला शेतीला पाणी पाजायला ई-पास द्या असा मजकूर असलेला अर्ज मंजूर करावा की नामंजूर करावा, अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. परंतू शासनाने दिलेल्या नियमानुसार सदरच्या अर्जावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे केवळ अत्यावश्यक कारण असलेल्यांनाच सातारा जिल्ह्याची सीमा ओलांडता आली.
------------
चौकट -
सातारा जिल्हा ई-पासबाबतची माहिती
दि. २३ एप्रिल ते ८ जून २०२१
एकूण दाखल अर्ज = १ लाख ६ हजार ८०५
मंजूर अर्ज = ५४,९११
नामंजूर अर्ज = ५१८९४
एकूण प्रलंबित = 0
-------------
चौकट-
जिल्ह्याबाहेर जाणेकरिता काहीही
सातारा जिल्ह्यातून बाहेर जाणेकरिता सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी अनेक कारणांचा जावईशोध केला.
अगदी मला कामावर जायचे आहे
मित्राला दवाखान्यात बघण्याकरिता जायचे आहे
नातेवाईक आजारी आहे
शासनाच्या नियमानुसार आसन व्यवस्था असे अनेक कारणांसह दाखल केलेले आॅनलाईन अर्ज नामंजूर करण्यात आले.
----
कोट-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाबंदीच्या निर्णयामुळे अत्यावश्यक कारणांसाठी इतर जिल्ह्यात जाण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या आॅनलाईन ई-पास कक्षाच्या माध्यमातून २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली होती. यामध्ये अत्यावश्यक कारणांकरिता जाणाऱ्या नागरिकांना शासनाने दिलेल्या नियमानुसार पोलीस दलाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात आल्याचे समाधान आहे.
अजयकुमार बन्सल - पोलीस अधीक्षक, सातारा
------
कोट -
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सतत २४ तास कार्यान्वित ठेवत ई-पास कक्षाच्या माध्यमातून कोरोनाकाळात सातारा जिल्ह्यातील नागरिकांना वैद्यकीय कारण तसेच अत्यावश्यक कारणांव्यतिरिक्त आलेले अर्ज नामंजूर करण्यात आले. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये याचा चांगला परिणाम दिसून आला.
नवनाथ घोगरे - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, सातारा जिल्हा