कऱ्हाड : सह्याद्री साखर कारखान्याच्या थकित ९९ रुपयांच्या बिलासंदर्भांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांचा ‘अल्टीमेटम’ दिला होता. तसेच दोन दिवसांच्या आत कारखान्याकडून ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी किंवा खुलासा करावा, अशी मागणीही केली होती. मात्र, सह्याद्री साखर कारखान्याकडून योग्य तोडगा काढला गेला नसल्याने याविरोधात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शुक्रवारी सह्याद्री कारखाना कार्यस्थळावर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडून ऊसबिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ‘सह्याद्री’च्या कार्यकारी संचालकांना निवेदन देत दोन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला होता. मात्र, याबाबत कार्यकारी संचालकांकडून मुदत देऊनही काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, कारखाना कार्यस्थळी ठिय्या आंदोलन करत असल्याची माहिती ‘स्वाभिमानी’चे कऱ्हाड उत्तर तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिली. याबाबतचे निवेदन तहसीलदार राजेंद्र शेळके यांना दिले आहे. यावेळी स्वाभिमानीचे दक्षिणचे अध्यक्ष देवानंद पाटील यांच्यासह प्रदीप मोहिते, संदीप पवार, दादासो यादव, बापूसो साळुंखे आदी उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे की, सह्याद्री साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिटन ९९ रुपये येणे बाकी आहेत. अद्याप ही शेतकऱ्यांना येणे बाकी असलेली प्रतिटन ९९ रुपये ही रक्कम मिळालेली नाही. (प्रतिनिधी) रास्तारोकोला परवानगी नाकारली...सह्याद्रीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्तारोको आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागीतली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने त्याला परवानगी नाकारल्याने कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘सह्याद्री’वर आज ‘स्वाभिमानी’चा ठिय्या!
By admin | Published: December 17, 2015 10:34 PM