कऱ्हाड : सह्याद्री प्रकल्पात दुर्मीळ ‘ग्रिफॉन गिधाड’ कॅमेराबद्ध झाल्याने पर्यावरणप्रेमी सुखावलेत; पण यापूर्वीही काही दुर्मीळ पक्षी या प्रकल्पात आढळून आले आहेत. त्यामध्ये राजगिधाड आणि निळा दयाळ या महत्त्वाच्या पक्ष्यांचा समावेश आहे. तसेच प्रकल्पात आजपर्यंत वेगवेगळ्या पक्ष्यांच्या तब्बल २५४ प्रजातींची नोंद झाली आहे.
पश्चिम घाटात आत्तापर्यंत ५०० प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यांपैकी २५४ प्रजातींची नोंद सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाल्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले. निळ्या पंखांच्या पोपटासारख्या (ब्लू विंग्ड पॅराकिट) काही जाती प्रकल्पात आहेत. त्या जगात फक्त पश्चिम घाटातच आढळतात.
जगात फक्त पश्चिम घाटातच पक्ष्यांच्या २८ प्रजाती नोंदल्या गेल्या आहेत. त्या प्रजातींपैकी १३ जातींच्या पक्ष्यांची नोंद केवळ सह्याद्री प्रकल्पातच झालेली आहे. येथील समृद्ध पक्षिजीवन पाहता भारतीय पक्षी संवर्धन संस्था व बीएनएचएस या भारतातील प्रमुख संस्थांनी कोयना व चांदोली या जंगल क्षेत्राला जगातील महत्त्वाचे पक्षिक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सह्याद्री प्रकल्पात कीटकभक्षी, मांसभक्षी, फुलातील रस पिणारे, फळ खाणारे, शिकारी, दाणे-बिया खाणारे, मासे खाणारे असे विविध प्रकारचे पक्षी आहेत.
- चौकट
... हे पक्षी केवळ प्रकल्पातच !
जगात फक्त पश्चिम घाटातच काही पक्षी आढळतात. त्यांपैकीही निलगिरी वृक्ष कबुतर, मलबारी पोपट, मलबारी चंडोल, राखी डोक्याचा बुलबुल, तांबूस सातभाई, पांढऱ्या पोटाचा नाचरा, निलगिरी फुलटोचा, छोटा शिंजीर, किरमिजी शिंजीर, मलबारी धनेश, करड्या छातीचा हरेल, मलबारी मैना हे पक्षी सह्याद्री प्रकल्पात नोंदले गेलेत.
- चौकट
सह्याद्री प्रकल्पात...
१) चांदोली राष्ट्रीय उद्यान
क्षेत्र : ३१७६७ हेक्टर
जिल्हा : सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी
२) कोयना अभयारण्य
क्षेत्र : ४२३५५ हेक्टर
जिल्हा : सातारा
(५ जानेवारी २०१० च्या अधिसूचनेनुसार चांदोली व कोयना सह्याद्री प्रकल्पात समाविष्ट)
- चौकट
कोयना अभयारण्यात २००३ साली हिमालयात आढळणारा ‘भारतीय निळा दयाळ’ तर २००७ मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यानात ‘राजगिधाड’ दिसले होते.
- चौकट
प्रकल्पात आढळणारे महत्त्वाचे पक्षी
पांढऱ्या पाठीचे गिधाड, भारतीय गिधाड, राजगिधाड, ठिपकेदार गरुड, महाधनेश, लोटेनचा सूर्यपक्षी, निलगिरी रानपारवा, नदी सुरय, मलबार पोपट, श्रीलंकन बेडूकमुखी, मलबार राखी धनेश, पांढऱ्या गालाचा तांबट, मलबार तुरेवाला चंडोल, निळा माशीमार, तांबूस सातभाई, छोटा सूर्यपक्षी, किरमिजी सूर्यपक्षी हे महत्त्वाचे पक्षी प्रकल्पात आढळतात.
- चौकट
पक्षी निरीक्षणाची ठिकाणे
१) राम नदी निरीक्षण मनोरा
२) झोळंबी येथील कारंबली
३) नवजा-ओझर्डे परिसर
४) रामबाण परिसर
५) नेचल दत्त धाम परिसर
६) गाढवखोप ते बाजे परिसर
७) वाल्मिकी मंदिर परिसर
८) मोरगिरी धरण परिसर
फोटो : २७केआरडी०२, ०३, ०४, ०५, ०६, ०७
कॅप्शन : सह्याद्री प्रकल्पात अनुक्रमे मलबारी चंडोल, निलगिरी कबुतर, किऱ्या राघू, रेकॅट टेल्ड ड्रोनंगो, निळा रॉबिन, मलबारी पोपट या पक्ष्यांना पक्षिनिरीक्षक डॉ. जितेंद्र कात्रे व रोहन भाटे यांनी कॅमेराबद्ध केले आहे.