दशरथ ननावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : उन्हाळा जसा वाढत चालला आहे तशी उन्हाळ्याची तीव्रता आणखी वाढत जात आहे. खंडाळा तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाण्याच्या टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. ऐन उन्हाळ्यात गावोगावी तलावात खडखडाट तर विहिरींनी तळ गाठला असताना अडगळीत पडलेले हातपंप लोकांसाठी तारणहार ठरत आहेत.पूर्वीच्या काळी गावांना नदी किंवा विहिरीद्वारे पाणी पुरवठा होत असे. अशा वेळी वाडीवस्तीवर किंवा टंचाई भासणाऱ्या गावातून हातपंपांची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या होत्या. नंतरच्या काळात प्रत्येक गावातून पाणी पुरवठा योजना राबविल्या गेल्या. नळाद्वारे घराघरात पाणी पोहोचविले गेले. तर अनेकांनी कूपनलिका घेऊन पाणी उपलब्ध करून घेतले. त्यामुळे हे हातपंप अडगळीत पडले होते. प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष झाले होते.यावर्षी सर्वत्रच दुष्काळाने तोंड वर काढले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईची भीषण समस्या उभी राहिली आहे. गावोगावी बांधलेल्या पाझर तलावात पाण्याचा खडखडाट झाला आहे. तर विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. अशा परिस्थितीत जुन्या हातपंपाकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. पाणीटंचाईच्या काळात आता हातपंपावर लोकांची गर्दी जमू लागली आहे. इतर वापरासाठी या पाण्याचा उपयोग होतोय तर काही गावांतून ते पिण्यासाठी योग्य आहे का? यासाठी तपासणीसाठी पाठवले जात आहे. त्यामुळे लोकांची तहान भागविण्यासाठी हेच पंप तारणहार ठरत आहेत. जलतज्ज्ञांच्या मते एका पावसाळ्यात प्रत्येक कुटुंबाने घरावरील छताचे पाणी एकत्र करून जमिनीत पुनर्भरण केल्यास पुढील दोन वर्षे हा पाणीसाठा कुटुंबाच्या उपयोगी पडेल.पाणी ही पृथ्वीतलावरील सर्वात मोठी संपत्ती आहे. गावोगावचे पाण्याचे स्त्रोत पुढील काळात जिवंत राहण्यासाठी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावातून घरोघरी पन्हाळीचे पाणी पाईपद्वारे एकत्रित करून ते गावच्या पाणवठ्याच्या ठिकाणी, हातपंपाच्या शेजारी खड्डे घेऊन जमिनीत मुरवले पाहिजे.त्यामुळे एकतर पावसाचे पाणी वाहून वाया जाणार नाही, शिवाय त्याच पाण्यातून जमिनीत भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.दुरुस्ती आवश्यकजिल्ह्यातील प्रत्येक गावातून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून हातपंप उभारले आहेत. गावांच्या विस्तारानुसार त्यांची संख्या कमी अधिक आहे. काळाच्या ओघात हे पाणी पुरवठ्याचे स्रोत अडगळीत पडले आहेत; पण सध्याच्या परिस्थितीत पाणीटंचाईची समस्या पुढे आल्यावर हीच साधने लक्षवेधी ठरली आहेत. ज्या गावांमधून पाण्याची कमतरता भासू लागली आहे त्या प्रत्येक गावातून जुन्या हातपंपांच्या दुरुस्तीची मोहिम जिल्हा परिषदेने हाती घ्यायला हवी . टंचाईच्या काळात त्यासाठी विशेष निधीची तरतूद करणे गरजेचे आहे . त्यामुळे पाण्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे .
ऐन उन्हाळ्यात हातपंपच ठरतोय लोकांना तारणहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 7:43 PM