उंडाळे : हलगी घुमक्याच्या तालावरील चित्तथरारक दांडपट्टा, फेटा परिधान केलेल्या तरुणींची लेझिम, धनगरी ढोलांच्या दणदणाटात धुंद होऊन सुरू असलेले धनगरी नृत्य, बालचमूंची वारकरी दिंडी आदी शौर्य आणि आध्यात्मिक वातावरणाचा सुरेख संगम साधत हजारो सारस्वतांच्या मांदियाळीने निघालेल्या ग्रंथ दिंडीने आज उंडाळे नगरी साहित्य प्रेमींच्या गजबजाटाने न्हाऊन निघाली. येथील २५ व्या समाजप्रबोधन मराठी साहित्य संमेलनास उत्साहात प्रारंभ झाला. ग्रामदैवत हनुमान व विठ्ठल रखुमाई मंदिरापासून प्रारंभ झाला. सजवलेल्या पालखीतून ग्रंथाचे पूजन करून दिंडी निघाली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अनिल अवचट, उद्घाटक इंद्रजित भालेराव, संयोजक विलासराव पाटील-उंडाळकर उपस्थित होते. टाळ-मृदगांच्या गजरात ज्ञानोबा-तुकारामाच्या जय घोषात दिंडीचा प्रारंभ झाला. दिंडीच्या अग्रभागी ओंड येथील शिवछावा ग्रुपचे कार्यकर्ते हलगी घुमक्याच्या तालावर थरारक दांडपट्ट्यांच्या कसरती करत होते. त्यामागे साळशिंरबे येथील धनगर बांधवांचा धनगरी ढोलाचा दणदणाट लक्ष वेधून घेत होता. त्यांच्या तालावर धुंद होऊन धनगरी नृत्य सादर करणारे कलाकार सहभागी झाले होते. त्यामागे इंग्लिश मीडियम स्कूल, स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयाच्या फेटाधारी मुलींचे लेझिम पथक वातावरणात चैतन्य आणत होते. दादा उंडाळकर विद्यालयाचा 'सावट दुष्काळाचे' हा चित्ररथ दुष्काळाचे चित्र नजरेसमोर उभा करत होता. असणारा चित्ररथ दुष्काळ व शेतकरी आत्महत्या याचे वास्तव दाखविताना यावरील उपाय योजना सांगत होता. दुष्काळाची दाहकता दाखविणारी पोस्टर लक्षवेधी ठरली. गरजेपुरते पाणी वापरा, वृक्षतोड थांबवा आदी संदेश फलकाच्या माध्यमातून देण्यात आले. (वार्ताहर)शिवरायांच्या रुपातील तरूण दिंडीचे आकर्षणदिंडीच्या मध्यभागी झाशीच्या राणीच्या रूपातील घोड्यावर स्वार झालेली तरुणी व छत्रपती शिवरायांच्या रूपातील तरुण दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले. शौर्य, आध्यात्म, साहित्य यांचा सुरेख संगम साधत निघालेली दिंडी मंदिरापासून उंडाळकर विद्यालयाच्या प्रांगणात आली. तेथे दिंडीची सांगता झाली.
सारस्वतांच्या मांदियाळीने सजली ग्रंथदिंडी
By admin | Published: February 17, 2016 10:07 PM