कऱ्हाड : येथील वाखाण रस्त्यालगत भाडेतत्त्वावरील खोलीत वास्तव्यास असलेल्या उज्ज्वला ठाणेकर या विवाहितेचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. अज्ञाताने गळा चिरून तिचा खून केला होता. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या सख्ख्या बहिणीसह अन्य एकास ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू होती.
उज्ज्वला रघुनाथ ठाणेकर (सध्या रा.वाखाण रोड, कऱ्हाड, मूळ रा.पेठ वडगाव, जि.कोल्हापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. शहरातील वाखाण रस्त्यालगत पाणीपुरवठा संस्थेसमोर उज्ज्वला ठाणेकर या भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होत्या. शनिवारी सकाळी त्यांचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. अज्ञाताने घरात शिरून किचनमध्ये उज्ज्वला यांच्यावर वार केला आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले होते.
याबाबत उज्ज्वलाच्या बहिणीचे पती सचिन निगडे (रा.मलकापूर) यांनी कऱ्हाड शहर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञातांवर खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला होता. कऱ्हाड शहर पोलिसांची तीन पथके वेगवगेळ्या ठिकाणी तपासासाठी रवाना झाली होती, तर साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही तपासासाठी कऱ्हाडात ठाण मांडून होते. रविवारी सायंकाळी पोलिसांनी या प्रकरणी उज्ज्वला यांची बहीण म्हणजेच सचिन निगडे यांच्या पत्नीसह अन्य एकाला या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, अन्य बाबींचाही तपास करण्याचे काम सुरू असून, या प्रकरणाची आणखी माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. आरोपी देत असलेल्या माहितीची खात्री केल्यानंतर दोन दिवसांतच सर्वच माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
- चौकट
पतीचे येणे-जाणे खटकले?
उज्ज्वला पतीसमवेत राहत नव्हती. ती एकटी कऱ्हाडात राहत होती. तिच्या घरी सचिन निगडे यांचे येणे-जाणे होते. निगडे यांच्या पत्नीला म्हणजेच उज्ज्वलाच्या बहिणीला हे खटकत होते. तोच राग मनात धरून खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच संशयावरून पोलिसांनी उज्ज्वलाच्या बहिणीला आणि अन्य एका युवकाला ताब्यात घेतले आहे.