खटाव : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही. कांद्याला प्रति किलो शंभर रुपये दर तर लसूण प्रति किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो असल्याने कांद्याच्या या भावाने सफरचंदाच्या प्रति किलोच्या भावाची बरोबरी गाठली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. तर दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांना मात्र हा कांदा व लसूण डोळ्यात पाणी आणू लागला आहे.मागील वर्षी कांद्याची आवक तसेच उत्पादन वाढल्यामुळे घाऊक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या कांद्याचे भाव प्रति किलो १० रुपये असा मिळाला होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. यावर्षी मात्र कांद्याच्या उत्पादनातच घट झाल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे.
कांदा व लसणाचे सध्या बाजारातील दर कडाडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील अत्यावश्यक असलेल्या या दोन घटकांमुळे गृहिणींना फोडणीला तडका देताना हात आखडता घेताना दमछाक होत आहे.तर गृहिणींचे महिन्याचे बजेट बिघडतानाचे चित्र दिसून येत आहे. सर्वसाधारण पाच ते दहा रुपये किलो दराने मिळणाऱ्या कांद्याने थेट शंभर रुपयांपर्यंत मजल मारली आहे. कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता कांदा व्यापारी व्यक्त करत आहेत. कोणतेही पदार्थ तयार करण्यात कांद्याला पहिले स्थान दिले जाते; परंतु कांद्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आता कांदा भाव खाऊ लागला आहे.
तर रोजच्या जेवणातून तूर्त कांदा हद्दपार होताना दिसतो आहे. तर औषधी म्हणून पाहिले जाणारे लसूणदेखील आता भाव खाऊ लागल्याने फोडणीचा तडका देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या दोन महत्त्वाच्या घटकाचा दर गगनाला भिडला आहे. त्यामुळे सध्या महिला तसेच व्यावसायिक आपला हात आखडता घेताना दिसून येत आहेत.
कांदा हा नाशवंत असल्याने त्याची साठवणूक करून ठेवता येत नाही. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे शेतात झालेल्या नुकसानीमुळे पालेभाज्याचे तसेच कडधान्याचे दर वाढले आहेत. या वाढत्या दरामुळे03 महिलांचे स्वयंपाक घरातील आठवड्याचे तसेच महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. आवश्यक त्या पदार्थांमध्ये कांदा व लसूण हे लागतेच, त्यामुळे याला दुसरा पर्याय नसल्याने त्याचे प्रमाण कमी करावे लागत आहे.-शबाना काझी,गृहिणी खटाव