सातारा : पालिकेच्यावतीने अत्यावश्यक सेवा म्हणून नागरिकांना दूध, फळे, भाजीपाला, किराणा माल घरपोच उपलब्ध केला जात आहे. याच गोष्टीचा फायदा घेत एका अॅपे रिक्षाचालकाने स्वत:चे बनावट ओळखपत्र तयार करून शहरात भाजी विक्री सुरू केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला असून, सर्वत्र खळबळ उडाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा पालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे पालिकेने सर्व जीवनावश्यक वस्तू नागरिकांना घरपोच करण्याची व्यवस्था उपलब्ध केली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात किराणा, भाजी, फळ व दुधाचा पुरवठा केला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व सातारा पालिकेच्यावतीने अत्यावश्यक सेवा म्हणून अशा विक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. या सर्व विक्रेत्यांची पालिकेत नोंद आहे.लॉकडाऊनचा फायदा घेत बनावट ओळखपत्राद्वारे भाजी विक्री करणाºया एका व्यावसायिकाचा गुरुवारी पडदा फाश झाला. पालिकेकडून देण्यात आलेल्या ओळखपत्राप्रमाणेच त्याने स्वत:चे ओळखपत्र तयार केले होते. त्यावर गाडीचा नंबर, शिक्का, सहीदेखील केली होती.
आपत्कालीन परिस्थितीचा गैरफायदा घेत विक्रेत्याकडून अशा प्रकारचे कृत्य करण्यात आल्याने प्रशासनही अचंबित झाले. प्रशासनाने अद्याप संबंधित अॅपे रिक्षा चालकावर कोणतीही कारवाई केली नसली तरी रिक्षा जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत.
पालिकेने दूध, भाजी व फळविक्री करणा-या व्यावसायिकांना ओळखपत्र दिले आहे. त्याचा कुणीही दुरुपयोग करू नये. नागरिकांना जलद व चांगल्या प्रकारे सेवा कशी देता येईल, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. जर कोणी दुरुपयोग करताना आढळल्यास संबंधितांवर प्रशासनाला कारवाई करावी लागेल.- संचित धुमाळ, उपमुख्याधिकारी