सातारा : लॉकडाऊनमधून सलून व पार्लर व्यवसाय वगळून येत्या तीन दिवसात परवानगी दिली नाही तर १२ एप्रिलपासून सर्व सलून व्यवसाय सुरू केले जातील. प्रशासनाने आडमुठी भूमिका घेतली तर व्यावसायिकांसाठी रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी दिला आहे.
गायकवाड यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने प्रत्येक कारागिराला त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पंधरा ते वीस हजार रुपये प्रति महिना द्यावेत, शासनाने सर्व व्यावसायिकांना कोरोना प्रतिबंधित लस देण्याचा आदेश काढला मात्र अद्याप कारागिरांना लस दिली नाही. वयाचा निकष न लावता सर्व सलूनमधील कारागिरांना तातडीने लस द्यावी तसेच सलून व पार्लर व्यवसाय लाॅकडाऊनमधून वगळून येत्या तीन ते चार दिवसात शासनाने हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. या मागण्यांची दखल घेतली नाही तर १३ एप्रिलपासून राज्यातील सर्व व्यवसाय सुरू केले जातील. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्यास नाभिक व्यावसायिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. त्याला संपूर्णपणे मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्य मंत्री जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे. याविषयीचे निवेदन राज्य सरचिटणीस मंगेश काशीद, जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण, पांडुरंग चव्हाण, राज्य सदस्य रामभाऊ पवार, तालुकाध्यक्ष जगन्नाथ पवार, प्रताप भोसले, चंद्रकांत सकपाळ, संकेत निकम, तानाजी काशीद, प्रशांत जाधव आदींनी दिले.