सातारा : स्वातंत्र्योत्तर काळात देशभरात घडणाऱ्या घडामोडी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी अनेक वृत्तपत्रे चालविली जात होती. मात्र, सातारसारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरात एक व्यक्ती रोज न थकता लाकडी फळ्यावर बातम्या लिहून पत्रकारितेचं व्रत जपत होती. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींविषयीच्या बातम्या ते फळ्यावर लिहित. ते नाव म्हणजे कॉ. वसंतराव आंबेकर. फलकावर बातम्या लिहून लोकांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या आंबेकर यांच्या स्मृतिफलकाचे अनावरण दि. ४ रोजी रविवार पेठ येथे होत आहे. वसंतराव आंबेकर यांना वाचनाची आवड होती. कोणताही राजकीय वारसा नसताना ते राजकीय वातावरणात रमू लागले. आपला व्यवसाय नोकरांवर सोपवून त्यांनी राज्यात सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. हळूहळू त्यांनी राजकारणात नाव कमवले. त्यांच्या डाव्या विचारांना मोठा पाठिंबा मिळाला. त्यांनी कम्युनिस्ट पक्षात स्वत:ला झोकून दिले. दरम्यान वाचनातून येणाऱ्या अनेक बाबींबाबत प्रबोधन करण्यासाठी त्यांनी आपल्या घरासमोर फलक लावला आणि त्यावर मार्मिक टिपण्णी लिहित पत्रकारितेला सुरुवात केली. रोज विविध विषयांवर लिहिलेल्या ठळक बातम्या वाचन्याठी लोक गर्दी करत. त्यांच्या बातम्यांसाठी व्यंगचित्र काढण्याची जबाबदारी ही हिरालाल परदेशी सांभाळायचे. वर्णनावरून कोणाचेही व्यंगचित्र रेखाटण्यात त्यांची हातोटी होती. (प्रतिनिधी)
फलकावरच्या पत्रकारितेला साताऱ्यात सलाम
By admin | Published: December 03, 2015 12:37 AM