सुपनेच्या जुन्या गावठाणाला ७०० ते ८०० वर्षांचा इतिहास आहे. येथे तत्कालीन वेशीलगत व महादेव मंदिर परिसरात ९ ते १० समाध्या आहेत. १९६७ च्या विनाशकारी भूकंपात जुन्या गावठाणाची मोठी पडझड झाली. त्यावेळी जुन्या गावठाणातून ग्रामस्थ सोयीने आपापल्या शेतात वास्तव्यास गेले. त्यानंतर नवीन गावठाण वसविण्यात आले. या भूकंपाच्या कालावधीत महादेव मंदिर परिसरात समाधीस्थाने दुर्लक्षित झाली होती. तसेच बहुतांश ग्रामस्थ याबाबत अनभिज्ञ असल्याने समाधी परिसरात झाडेझुडपे वाढल्याने काही समाध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, इतिहासप्रेमी व दुर्गप्रेमी शिवाजी पाटील यांच्या इतिहास संशोधकांच्या संपर्कामुळे व त्यांच्या मार्गदर्शनामुळे संबंधित दुर्लक्षित समाधीस्थानांकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. इतिहास संशोधकांनी सुपने गावात समाधीस्थाने पाहण्यासाठी भेट दिली.
हा ऐतिहासिक ठेवा व वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी आता ग्रामस्थ व युवक सरसावले असून इतिहास संशोधकांच्या सहकार्याने ऐतिहासिक संदर्भ, पुरावे, कागदपत्रे यांचाही शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
- चौकट
समाध्यांवर राजचिन्हांसह शिलालेख
प्रथम सर्व समाध्यांची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर काही समाध्यांभोवती उत्खनन केले असता त्या समाध्यांवर शिलालेख व राजचिन्हे आढळली असून, या समाध्या इतिहासात रणांगणावर पराक्रम गाजवलेल्या तसेच धारातीर्थी पडलेल्या वीर पुरुषांच्या असल्याचे सिद्ध होत आहे. महादेव मंदिर परिसरात अनेक वीरगळी तसेच सतीशिळाही आहेत. यावरून सुपने गावाला शेकडो वर्षांचा देदीप्यमान इतिहास असल्याचे उघड झाले आहे.
फोटो : २१केआरडी०३
कॅप्शन : सुपने, ता. कऱ्हाड येथील जुन्या गावठाणात समाध्या आढळल्या असून, त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.