लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : समर्थ मंदिर ते बोगदा रस्त्यावर नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या प्रयत्नातून पथदिवे बसविणे व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पथदिव्यांमुळे या रस्त्याला नवी झळाळी प्राप्त होणार असल्याने परिसरातील नागरिक व वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २० मध्ये रखडलेली अनेक कामे मार्गी लावली आहेत. याच प्रभागातील समर्थ मंदिर ते बोगदा रस्त्यावर विजेचे खांब विसंगत उभे असल्याने तसेच फ़ूटपाथ नसल्याने कुरणेश्वर, सज्जनगड, कास व ठोसेघर या पर्यटन क्षेत्रांकडे जाणाऱ्या पर्यटकांना, नागरिकांना व वाहनधारकांना अडचणी उद्भवत होत्या. तसेच या रस्त्यांवर पथदिवे नादुरुस्त असल्याने रात्रीच्यावेळी छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाणही वाढले होते. यावर तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याने नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी सातारा नगरपालिकेत पाठपुरावा करुन या रस्त्यावरील विसंगत असणारे खांब रस्त्याच्या कडेला बसवून रस्ता रुंद करण्याचे काम हाती घेतले. तसेच चालत जाणाऱ्या नागरिकांसाठी फ़ूटपाथ करण्याचे कामही लवकरच सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या रस्त्यावर एलईडी दिवे बसविले जाणार असल्याने रस्ता उजळून निघणार आहे.
या कामासाठी नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने, सहाय्यक अभियंता अभिजित पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या कामाचा शुभारंभ पेठेतील प्रतिष्ठित नागरिक संतोष चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सचिन क्षीरसागर, जनता बँक चेअरमन अतुल जाधव व नागरिक उपस्थित होते.
फोटो मेल :
साताऱ्यातील समर्थ मंदिर येथे नगरसेवक सुहास राजेशिर्के यांच्या उपस्थितीत पथदिवे बसविण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.