आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक न्याय दिन म्हणून सोमवारी शहरातून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने झांजपथक, लेझीमच्या तालावर काढण्यात आलेल्या समता दिंडीला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू बोर्डिंग, पोवई नाका, सातारा येथून सकाळी ८.३० वाजता समता दिंडीला प्रारंभ झाला. या समता दिंडीमध्ये सातारा शहरातील विविध विद्यालयांतील विद्यार्थी-विद्याथिंर्नी उत्कृष्टरीत्या संचलन केले. दिंडीमध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग तसेच विविध विकास महामंडळांच्या योजनांची चित्ररुपाने माहिती देणाऱ्या चित्ररथांचा समावेश होता. प्रारंभी छत्रपती शाहू बोर्डिंग येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी चांगदेव बागल, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण आदींनी राजर्षी शाहू महाराजांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लहुजी उस्ताद यांच्या पुतळ्यासही मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध शासकीय कार्यालयांचे तसेच विविध मागासवर्गीय विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक न्याय दिनानिमित्त साताऱ्यात समता दिंडी
By admin | Published: June 26, 2017 2:24 PM