रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील पाझर तलावावर पाणी पिण्यासाठी आलेल्या मादी सांबराचा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी सांबर तलावात शिरले. वनरक्षकाने कुत्र्यांची टोळी हाकलून सांबराला जंगलात जाण्याचा मार्ग मोकळा करून देत जीवदान दिले.
याबाबत माहिती अशी की, नागझरी येथील वनहद्दीतील जंगल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सांबरांचा वावर आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पूर्ण वाढ झालेले मादी सांबर पाणी पिण्यासाठी जवळील पाझर तलावावर आले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या मोकाट दहा-पंधरा कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी सांबर तलावातील पाण्यात शिरले. तरीही कुत्र्यांची टोळी सांबराची वाट पाहत तलावाच्या काठावर दबा धरून बसली होती. हे दृश्य पाहून शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने याबाबतची माहिती दूरध्वनीवरून वनरक्षक नवनाथ कोळेकर यांना दिली.
कोळेकर यांनी याबाबतची माहिती वनपाल अनिल देशमुख यांना देऊन, त्यांच्या सूचनेनुसार तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. कुत्र्यांच्या भीतीने तलावात घुसलेले सांबर पाण्याबाहेर येण्यास धजावत नव्हते. नवनाथ कोळेकर यांनी वन विभागाचे सुरक्षा कर्मचारी अविनाश माळवे व अमोल कुंभार यांना बरोबर घेऊन तलावाच्या काठावर दबा धरून बसलेल्या कुत्र्यांच्या टोळीला पिटाळून लावले. तसेच पाण्यातून सांबराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र काही केल्या सांबर पाण्यातून बाहेर येत नव्हते. दुसरा पर्याय नसल्यामुळे नवनाथ कोळेकर यांनी पोहत सांबराजवळ जाऊन त्याला जंगलाच्या दिशेने हाकलून लावले. सुमारे पाच तासानंतर पाण्यातून बाहेर पडताच सांबराने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. काही क्षणातच झाडा-झुडपात ते दिसेनासे झाले आणि सांबराचा जीव वाचल्याने उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
चाैकट :
कुत्र्यांच्या टोळीचा बंदोबस्त करा
नागझरी येथील पाझर तलाव परिसरात वावरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा धुडगूस सुरू आहे. तहान भागवण्यासाठी तलावावर येणाऱ्या वन्यप्राण्यांचा पाठलाग ही कुत्र्यांची टोळी वारंवार करते. यापूर्वीही अनेक वन्यप्राणी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या कुत्र्यांच्या टोळीने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, पिले व गाईंची कालवडे यांच्यावर हल्ले केले आहेत. या परिसरात एकट्या दुकट्या शेतकऱ्यालाही फिरताना कुत्र्यांची भीती वाटते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
फोटो :
०९रहिमतपूर
नागझरी, ता. कोरेगाव येथील कुत्र्यांच्या टोळीपासून जीव वाचविण्यासाठी सांबर पाच तास तलावातील पाण्यातच होते. (छाया : जयदीप जाधव)