सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत घेतलेला निर्णय हा दुर्दैवी घटना आहे; परंतु या पाठीमागे मोठे षड्यंत्र सामान्य माणसाला दिसून येत आहे. त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी कार्यालयावर ज्यांनी सूडबुद्धीने दगडफेक केली, ते कोणत्या पक्षाशी व ‘संघा’शी संलग्न आहेत, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
छत्रपती शिवराय यांच्या राजधानीत सच्चा मावळा असे कृत्य कधी ही करणार नाही. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या आरोपींचे कोणाकोणाशी संबंध आले? हा कट कुठे शिजला? याची पाळेमुळे पोलीस यंत्रणेने शोधली पाहिजेत. अशा हल्ल्याला मराठा समाज व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. म्हणून पोलीस यंत्रणेला अगोदर आम्ही जाब विचारण्यासाठी पोहोचलो आहे. आपल्याला खूप मोठी शाबासकी मिळेल, या भ्रमात संबंधितांनी राहू नये. आम्ही जशास तसे उत्तम प्रकारे उत्तर देऊ शकतो, असा मार्मिक इशाराही आ. शिंदे यांनी दिला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालय जो निर्णय घेईल, त्याबाबत राज्य सरकारला श्रेय किंवा दोष देता येणार नाही. सध्या आरक्षण निकालाने त्यांची भूमिका ही मराठा समाजामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करणारी प्रथमदर्शनी दिसून येत आहे. बहुजन व मराठा समाजाबद्दल आकस असल्याने त्यांनी अनेक मराठा समाजातील नेतृत्व आपल्या बाजूला ओढून घेतले आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे माजी मुख्यमंत्री उभे राहिले. अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कमी करण्यासाठी कधी ईडी, सी.बी.आय., गुप्तचर विभाग, फोन टॅपिंगचे प्रकार मागे लावले, तरी तेवढी ताकद मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे लावली नाही, ३७० कलम रद्द करणे, तलाक पद्धत रद्द करणे, नोटाबंदी, लॉकडाऊनचे निर्णय पटकन घेतले जातात. मग मराठा आरक्षणाचा निर्णयसुद्धा ते घेऊ शकत होते; पण त्यांनी ते केले नाही, ते झाले असते तर केंद्राने केले, असे सांगून नेहमीप्रमाणे दिशाभूल केली असती, असाही आरोप आ. शशिकांतजी शिंदे यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष तेजस शिंदे, अतुल शिंदे, गोरखनाथ नलावडे, मंगेश ढाणे, शुभम साळुंखे, पै नीलेश पाटील, पारिजात दळवी, सनी शिर्के, अजित बर्गे, सागर पवार, वरद फडतरे, कामेश कांबळे, मल्लेश मुलगे व मराठा युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.