सांगली : छुप्या प्रचाराची फेरी पूर्ण झाली असली तरी, गुरुवारी उमेदवारांच्या अधिकृत प्रचार कार्यक्रमांना प्रारंभ झाला. आज एकाचदिवशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रचारसभा घेऊन विधानसभेसाठी रणशिंग फुंकले. अन्य पक्षीय उमेदवारांनीही मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. प्रचार प्रारंभाच्या निमित्ताने आता आरोप-प्रत्यारोपांचे फड रंगत आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघात आजपासून प्रचाराचा धडाका सुरू झाला. राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या प्रचारासाठी आज माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील सांगलीत होते. हरिपूर येथे प्रचार प्रारंभाची सभा पार पडली. दुसरीकडे काँग्रेस, भाजप व मनसेच्या उमेदवारांनीही भेटीगाठी व प्रचार कार्यक्रमांवर भर दिला. शिवसेनेच्या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रचार प्रारंभ करण्यात आला. शिवसेनेने भाजपवर टीका केली, तर जयंत पाटील यांनी मदन पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यामुळे आता जयंत पाटील आणि मदन पाटील यांच्यातील वाक्युद्ध रंगणार आहे. प्रचारासाठी जिल्ह्यातील उमेदवारांकडे केवळ ११ दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराचा नारळ फोडतानाच पायाला भिंगरी लावून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. यासाठी उमेदवार व त्यांच्या नेत्यांची मॅरेथॉन स्पर्धा रंगली आहे. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांनीही आता प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी सभेची तयारी सुरू केली आहे. प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार कार्यक्रमांची आखणी केली आहे. सांगलीतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मुन्ना कुरणे व दिगंबर जाधव यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. सांगली, कुपवाडसह बारा गावांमध्ये आता निवडणुकीचे वातावरण दिसू लागले आहे. सांगलीत प्रमुख पक्षाचे उमेदवार प्रतिस्पर्ध्यांवर नजर ठेवून आहेत. त्यासाठी काही कार्यकर्त्यांची नियुक्ती झाली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचार सभेला उपस्थिती लावून त्याठिकाणची माहिती उमेदवारांना पोहोचविली जात आहे. त्यानुसार रणनीतीही आखली जात आहे. सांगलीतील उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांमध्येही दिवसभर गर्दी दिसत होती. काँग्रेसचे उमेदवार मदन पाटील यांनी गुरुवारी सांगलीत प्रचारावर भर दिला. (प्रतिनिधी)दसऱ्याचा सण प्रचाराचा...दसऱ्याला शासकीय सुट्टी असल्याने मतदारांची भेट होणे सहज शक्य होणार असल्याने प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने दसऱ्याचा मुहूर्त प्रचारासाठी शुभ मानला आहे. त्यानुसार प्रचार कार्यालयांमध्ये नियोजनही झालेले आहे. ४प्रचारासाठी कार्यकर्तेही आता मतदारसंघात सर्वत्र फिरू लागले आहेत. पक्षीय चिन्हाच्या टोप्या आणि गळ्यातील पट्ट्या घालून कार्यकर्ते गुरुवारी प्रचार कार्यक्रमांमध्ये दिसत होते. गटा-गटाने कार्यकर्ते प्रचारात दिसत आहेत.
सांगलीत प्रचाराचा धडाका
By admin | Published: October 02, 2014 9:33 PM