सातारा : सांगलीहून कास पठार पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारला रस्त्यात रानडुक्कर आडवे आल्याने कार नाल्यात गेली. यामध्ये कारमधील पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली असून सर्वजण सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात शनिवारी पहाटे साडेतीन वाजता झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,सांगलीतील काही पर्यटक शनिवारी कास पठार पाहण्यासाठी आले होते. रात्री या पर्यटकांनी रस्त्याच्याकडेला टेंट टाकून वास्तव्य केले होते. पहाटे साडेतीन वाजता कारमधून पाचजण टेंटकडे निघाले होते. यावेळी कास तलावाच्या परिसरात त्यांच्या कारला अचानक रानडुक्कर आडवे आले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात गेली. कारमधील पर्यटकांना किरकोळ दुखापत झाली. या अपघाताची माहिती कास पठार वन समितीचे आणि शिवेंद्रसिंहराजे रेक्स्यू टीमचे सदस्य अभिषेक शेजार व एकनाथ सुतार यांनी घटनास`थळी धाव घेऊन मदतकार्य केले. कारमधील पर्यटकांना किरकोळ जखम झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. या अपघाताची रात्रीउशिरापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.