लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘आमच्या घरातील आम्ही बघू. त्यांनी स्वत:च्या घरात अगोदर बघावे. जळगावच्या सभेततर त्यांना दोन-तीन मिनीटेच बोलू दिले. यावरुनच त्यांनी समजून जावे. त्यांची अवस्था स्वत:च ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी आहे,’ असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना लगावला.
सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पालकमंत्री देसाई यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. देसाई पुढे म्हणाले, ‘संजय राऊत यांना एक प्रश्न विचारायचा आहे. दिल्लीत भाजप आणि शिवसेनेच्या गोटात काय चालले आहे हे समजायला ते का आंतर्यामी आहेत काय ? जे त्यांना येथे बसून त्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री बदलाच्या हालचालीही सुरू आहेत असे सांगतात. हा प्रकार म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ ची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढेल का ? हे सांगता येत नाही यापासून लक्ष विचलीत करण्यासाठीच आहे.
विधानसभेत आमचे बहुमत आहे. हे दोनवेळा आम्ही सिध्द करुन दाखवलंय. आताही आम्ही १८० च्या पुढे आहोत. आमची युती भक्कम आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आमच्या पाठिशी असून २०२४ ची निवडणूकही एकत्रच लढणार आहोत. त्यामुळे संजय राऊत यांनी आमची चिंता करुन नये, असा टोलाही पालकमंत्री देसाई यांनी लगावला.