सातारा : महाराष्ट्र केसरीच्या लढतीसाठी संजय सूळ व नीलेश लोखंडे यांनी बाजी मारली. सूळ गादी विभागातून तर लोखंडे माती विभागातून सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
येथील तालीम संघाच्या मैदानावर हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष साहेबराव पवार, मल्ल सुधीर पवार, जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे आदी उपस्थिती होते.
माती विभागातून उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे यांचा चिरंजीव नीलेश लोखंडे याने शिंगणापूरचा पैलवान सचिन ठोंबरे याच्यावर १०-० गुणांनी विजय मिळविला. गादी विभागात संजय सूळ विरुद्ध राजेश्वर पवार यांच्यातील लढतही लक्षवेधी ठरली. यात सूळ याने गुणाने विजय मिळविला.
माती विभागातील इतर कुस्त्यांतील विजेते वजनी गटानुसार असे : प्रवीण गोडसे (५७ किलो), सागर सूळ (६१), विशाल कोकरे (६५), राहुल कोकरे (७०), महादेव माने (७४), किरण बरकडे (७९), जयदीप गायकवाड (८६), रामदास पवार (९२), प्रशांत श्ािंदे (९७). गादी विभागातील विजेत्यांची नावे अशी : प्रदीप सूळ (५७), वैभव शेडगे (६१), सुमीत गुजर (६५), आकाश माने (७०), विशाल राजगे (७४), श्रीधर मुळीक (७९), नीलेश तरंगे (८६), तुषार ठोंबरे (९२), विकास सूळ (९७). या पैलवानांची जालना येथे १९ ते २३ डिसेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाली.उत्तम निवेदनामुळे स्पर्धेला बहरउमेश पाटील व अनिकेत कदम या दोघांनी या कुस्तीचे निवेदन केले. कुस्तीतील डावांची इतंभूत माहिती देत या दोघांनीही कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.सातारा तालीम संघाच्या मैदानावर प्रतिस्पर्धी पैलवानाला चितपट केल्यानंतर विजयी मुद्रेत या पैलवानाने उपस्थित कुस्ती शौकिनांच्या टाळ्या स्वीकारल्या.