सातारा : सिरियल किलर संतोष पोळच्या सुरक्षिततेला जिल्हा कारागृहात धोक्याची शक्यता असल्याने त्याची रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात करण्यात येणार आहे. तेथे त्याला स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येणार आहे. तो तीन गार्ड आणि चोवीस तास सीसीटीव्हीच्या नजरेखाली असणार आहे. संतोष पोळने केलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. समाजामधून त्याच्यावर संताप आणि रोष प्रचंड वाढलेला आहे. अनेकांनी त्याला फासावर लटकवा, तर काहींनी त्याला न्यायालयात नेताना चपलांचा हार घाला, असा तंबीवजा इशारा दिल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातही बंदिवानांमध्ये संतोष पोळच्या कृत्याबाबत तीव्र संताप आहे. त्यामुळे संतोष पोळला जर जिल्हा कारागृहात ठेवले तर इतर बंदिवानांकडून त्याच्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे कारागृह अधीक्षक एन. एन. चोंधे यांनी खबरदारी म्हणून संतोष पोळला ‘हाय सिक्युरिटी जेल’मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा कारागृहात अशा प्रकारच्या सिरियल किलरला ठेवण्याची स्वतंत्र जागा नाही. त्यामुळे कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये त्याच्यासाठी स्वतंत्र बराकीची सोय करण्यात आली आहे. तीन गार्ड आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीत तो राहणार आहे. तेथील त्याची वर्तणूक कशी आहे, हे सर्व तेथील कारागृह प्रशासन अधिकारी आणि पोलिस अधीक्षक पाहणार आहेत. संतोषची साथीदार ज्योती मांढरेलाही कळंबा जेलमध्येच ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) ‘खून पैशासाठी केले’ संतोष पोळला पोलिसांची कोठडी संपल्यानंतर कारागृहात नेण्यात आले. यावेळी अधीक्षक चोंधे यांनी त्याला काही प्रश्न केले. ‘तू एवढे खून केलेस का, कशासाठी केलेस?, असे विचारल्यानंतर त्याने ‘हो, मी खून केलेत; पण पैशासाठी. किडनीसाठी नाही.’ त्याच्या कुटुंबाबाबत चोंधेंनी विचारपूस केली असता संतोष पोळ ढसाढसा रडला. कुटुंबाचा विषय काढला की तो प्रचंड भावनिक होत असल्याचेही चोंधे यांनी सांगितले.
संतोष पोळला कळंबा कारागृहात हलविणार
By admin | Published: August 28, 2016 12:07 AM