सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात शनिवारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह आलेला पाऊस ‘सैराट’ झाला आहे. सातारा, महाबळेश्वर, कऱ्हाड, वाई येथे झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. यंदा अपेक्षेपेक्षा काहीसा उशिराच पावसाला सुरुवात झाली. चार दिवस चांगला पाऊस झाला त्यानंतर चार दिवस उघडीप घेतली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतेत होता. त्यातच शनिवारी सायंकाळनंतर जिल्ह्यातील सर्वच भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे ठिकठिकाणी झाडे पडल्याने वीजवाहक तारा तुटल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. कऱ्हाड येथील चौकात एक झाड पडल्याने रविवारी वाहतूक विस्कळीत झाली होती. यामध्ये वित्तहानी झाली नसली तरी चार तरुणी थोडक्यात बचावल्या आहेत. वाई येथील बावधन नाका येथे महाकाय ब्रिटिशकालीन झाड एक कार आणि दुचाकीवर कोसळले. रविवारी सकाळी झालेल्या चोवीस तासांत पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : सातारा ३४.६, जावळी ६८.९, पाटण ५०.५, कऱ्हाड १७.२, कोरेगाव १०, माण ३.१, खटाव ६.७, फलटण १.९, खंडाळा १७.७, महाबळेश्वर १७३.९. (प्रतिनिधी) वाईमध्ये कारवर झाड कोसळले बावधन/वाई : वाई येथे वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाने शेकडो वर्षे जुने महाकाय झाड रविवारी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कार आणि दुचाकीवर कोसळले. यामध्ये मोठे नुकसान झाले असून, जीवितहानी झाली नाही. वाई तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कमी असला तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडण्याच्या घटना ठिकठिकाणी घडत आहेत. काही ठिकाणी वीजवाहक ताराही तुटून पडल्या आहेत. वाईतील बावधन नाका येथील पेट्रोल पंपाजवळ रविवारी सायंकाळी शेकडो वर्षे जुने महाकाय वडाचे झाड अचानक पडले. जवळच लावलेली कार (एमएच १२ केएल ५४५६) वर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. तसेच एका दुचाकीचाही चक्काचूर झाला. वीजवाहक तारा तुटल्याने शहरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अतुल म्हेत्रे, बांधकाम विभागाचे अभियंता क्रांतिकुमार मिरजकर घटनास्थळी दाखल झाले. दोन जेसीबी, कटर मशीन व ट्रॅक्टरच्या साह्याने झाड बाजूला केले. वाई-पाचगणी रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. वाई पोलिसांनी ठप्प झालेली वाहतूक शहरातून पंचायत समिती मार्गे वळविली. सुमारे दीड तासांनंतर हे झाड बाजूला करण्यात यश आले. (प्रतिनिधी) ब्रिटिशकालीन वृक्ष ब्रिटिश राजवटीत असंख्य झाडे लावण्यात आले होते. ब्रिटिशांनी वाठार स्टेशनपासून ते वाईच्या किसन वीर महाविद्यालयापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वडाच्या झाडांची लागवड केली होती. त्यामुळे रस्त्याला सौंदर्य प्राप्त झाले होते. वाठार स्टेशनवरून ब्रिटिश राणी बग्गीतून या रस्त्यावरून पाचगणी-महाबळेश्वरला जात होते. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक घटनांचे हे महाकाय वडाचे झाड साक्षीदार होते. झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत कऱ्हाडात संततधार : चार युवती थोडक्यात बचावल्या कऱ्हाड : येथील विजय दिवस चौकात रविवारी दुपारी झाड उन्मळून पडल्याने वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. जेसीबीच्या साह्याने झाड हटविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, कऱ्हाडसह पाटण तालुक्यात रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. शहरातील विजय दिवस चौकात सिग्नलनजीक असणारे झाड रविवारी दुपारी अचानक उन्मळून पडले. या दुर्घटनेतून सुदैवाने चार युवती बचावल्या. संबंधित युवती बसस्थानकाकडून टाऊन हॉलकडे जात असताना अचानक झाड कोसळले. झाडाच्या फांद्याचा आवाज झाल्याने व परिसरातील नागरिक ओरडल्याने त्या युवती तेथून सुरक्षित ठिकाणी पळाल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. झाड रस्त्यातच पडल्याने वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक बसस्थानकापासून बिरोबा मंदिर, बापूजी साळूंखे पुतळा चौक, प्रभात टॉकीजमार्गे वळविली. रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिल्याने शहरातील सखल भाग जलमय झाला होता. महामार्गावरील वाहतूकही मंदावली होती. मंडई परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. या पाण्यातच अनेक विक्रेते साहित्य घेऊन बसले होते. सायंकाळी पावसाची जोर ओसरल्यानंतर मंडईत खरेदीसाठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी) महाबळेश्वरात अनेक घरांमध्ये पाणी घुसले महाबळेश्वर : पावसाचे माहेरघर असलेल्या महाबळेश्वरला यंदा प्रथम शनिवारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे बाजारपेठेत रस्त्यावरून पाणी वाहत होते. अनेकांच्या घरात पाणी घुसले असून, पर्यटकांच्या अनेक वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी घुसल्याने गाड्या बंद पडल्या होत्या. आसिफ डांगे यांच्या घरात पाणी शिरले होते. महाबळेश्वर आणि मुसळधार पाऊस हे समीकरण किती घट्ट आहे, याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांपासून येत आहे. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने महाबळेश्वरला झोडपून काढले. त्यामुळे महाबळेश्वरमधील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. वेण्णा लेक येथे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे स्थानिक नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. संततधार पावसामुळे गारठा वाढला आहे. ऐतिहासिक वेण्णा लेक तलाव दुथडी भरून ओसडून वाहू लागला आहे. रविवार साडेआठ वाजता झालेल्या चोवीस तासांत महाबळेश्वरमध्ये १७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या हंगामात आजअखेर १,६९३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे महाबळेश्वर-पाचगणी रस्त्याची वाहतूक काही वेळ टप्प झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली; परंतु रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहने पाण्यातून काढण्यासाठी वाहन चालकाला तारेवरची कसरत करावी लागत होती. यावेळी पाणी वाहनांमध्ये गेल्यामुळे अनेकाची वाहने बंद पडली होती. (प्रतिनिधी) वर्षासहलीचा मनमुराद आनंद शनिवार, रविवार सुटीचे दिवस असल्यामुळे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. मुसळधर पावसात वेण्णा लेक व बाजारपेठेमध्ये मनसोक्त भिजत पर्यटक वर्षासहलीचा आनंद घेत होते.
पश्चिम भागात पाऊस जाहला सैराट!
By admin | Published: July 11, 2016 12:55 AM