सातारा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. या परिस्थितीत ग्रामसेवकांसह सरपंचही विविध उपाययोजना राबवीत आहेत. मात्र, लॉकडाऊन लागू असल्याने अनेकदा अत्यावश्यक ठिकाणी जाताना ओळखपत्राचा पुरावा नसल्याने सरपंचांना विविध समस्यांशी सामना करावा लागतो. यासाठी जिल्ह्यातील जवळपास १४९० हून अधिक सरपंचांना ओळखपत्र देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण वाढतच चालले आहेत. या परिस्थितीत गावनिहाय विलगीकरण कक्ष, कोरोना प्रादुर्भावाची जनजागृती, माहितीपत्रके व इतर उपाययोजना राबविण्यासाठी सरपंचांना बाहेर फिरावे लागते. या प्रसंगी सरपंचांकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने अनेकदा पोलिसांकडून कारवाईचा सामना करावा लागत आहे. यासाठी सरपंच परिषदेने प्रत्येक सरपंचांना ओळखपत्र देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता सरपंचांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा सोडून सर्व बंद ठेवण्यात आले आहे. या परिस्थितीत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असल्याने अनेकदा प्रशासकीय कामकाजासाठी जिल्हा व तालुकास्तरावर जावे लागते. याप्रसंगी कोणताही ओळखपत्राचा पुरावा नसल्याने अनेकदा पोलीस यंत्रणा वाहने जप्त व इतर दंडात्मक कारवाई करते. त्यामुळे आता प्रत्येक सरपंचांना ओळखपत्र दिले जाणार असल्याने दिलासा मिळणार आहे.
..........
कोट :
कोरोनाच्या काळात गावनिहाय उपाययोजना राबविण्यात येतात. कामासाठी जाताना सरपंचांना अडचणी येत असल्याने त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात सरपंचांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होईल.
- अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग
.........................................................................