फलटण : ‘फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका शांततेत, उत्साही वातावरणात, पारदर्शी वातावरणात पार पडल्या. आता शुक्रवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता येथील प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन येथे तालुक्यातील सर्व १३१ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे,’ अशी माहिती तहसीलदार समीर यादव यांनी शनिवारी दिली.
फलटण तालुक्यात १३१ ग्रामपंचायती असून त्यांपैकी मुदत संपलेल्या ८० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच शांततेत पार पडल्या. त्यांपैकी सहा ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत.
अनुसूचित जातीसाठी १९ सरपंचपदे आरक्षित राहणार असून त्यामध्ये १० महिला व नऊ जागा खुल्या (स्त्री अथवा पुरुष), अनुसूचित जमातीसाठी एक जागा आरक्षित असून सोडतीद्वारे महिला / खुला प्रवर्ग निश्चित करण्यात येणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३५ पदे आरक्षित करण्यात येणार आहे. त्यांपैकी १८ पदे महिलांसाठी आणि १७ पदे खुली (स्त्री अथवा पुरुष) राहणार आहेत.
खुल्या (सर्वसाधारण) गटासाठी ७६ पदे आरक्षित करण्यात येणार असून, त्यांपैकी ३८ महिलांसाठी आरक्षित राहणार असून उर्वरित ३८ पदे खुली (स्त्री अथवा पुरुष) ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार समीर यादव यांनी कळविले आहे. याप्रमाणे जिल्हाधिकारी सातारा यांनी फलटण ग्रामपंचायत आरक्षण वाटप केले असून, शुक्रवारी सकाळी ११ वाजता सरपंचपदाचे गावनिहाय आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार असल्याचे तहसीलदार समीर यादव व नायब तहसीलदार रमेश पाटील यांनी कळविले आहे.