कोपर्डे हवेली : सध्या कोराेनामुळे ग्रामपंचायतीचा महसूल होत नाही. त्यामध्येच वीज वितरण कंपनीने गावातील पथदिव्यांची वीज जोडणी तोडली आहे. ग्रामपंचायतीपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. यातून शासनाने मार्ग काढून पुन्हा विजेची जोडणी जोडावी, अन्यथा सरपंच परिषद आंदोलन करेल, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना दिले आहे.
यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, सरपंच परिषदेचे कऱ्हाड तालुकाध्यक्ष शंकरराव खापे, पाटणचे अध्यक्ष संतोष शेडगे, सूरज कीर्तीकर, रणजित पाटील, फत्तेसिंह जाधव, प्रताप चव्हाण, गीता अनपट, शीतल गायकवाड, उमा माने उपस्थित होते.
निवेदनावर सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सरपंचांच्या सह्या होत्या. निवेदनामध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे ग्रामपंचायतीची वसुली बंद आहे. लाॅकडाऊनमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे वसुली करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अशा अवस्थेत वीज वितरण कंपनीने सक्तीची वसुली करून पाणी पुरवठा योजनेची जोडणी तोडली आहे. तसेच पथदिव्यांचे बिल हे आजपर्यंत शासन भरत होते. ते बिल ग्रामपंचायतीला देऊन थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीने वीज बंद केली आहे. ते बिल शासनाने भरणे क्रमप्राप्त आहे. कोरोनाची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असल्याने तो नाहक त्रास झाला आहे. आता महावितरणने सक्तीची वसुली करून पाणी पुरवठा, पथदिवे बंद करून वेठीस धरले आहे. तरी सक्तीची वसुली बंद करून तोडलेली जोडणी त्वरित जोडावीत. कोरोना संपल्यानंतर वसुली करावी, अन्यथा सरपंचांना आंदोलन करणे भाग पडेल.