सातारा : वीजबिल थकल्याने ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरची वीज तोडण्यात आली आहे. ही वीज पुन्हा जोडावी, या मागणीसाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेतर्फे शुक्रवारी साताऱ्यामध्ये कंदील मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायतीची तोडलेली वीज पुन्हा जोडली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.
ग्रामपंचायतींच्या हद्दीमधील रस्त्यावर सार्वजनिक वीज पुरवठा केला जातो. हे बिल पूर्वी शासनाकडून भरले जायचे. २०१२पासून शासनाने हे वीजबिल भरणे बंद केले आणि त्याची थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढली. ही थकीत बिले लाखोंच्या घरात आहेत. ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून ही बिले भरणे शक्य नसल्याने ग्रामपंचायती हतबल आहेत.
राज्य शासनाने १५ व्या वित्त आयोगातून वीजबिल भरण्यास परवानगी दिली असली तरीदेखील या वित्त आयोगातून मिळणारे सर्व पैसे वीजबिलांची थकबाकी भरण्यास वापरले तरीदेखील ग्रामपंचायतींवर वीजबिलाचा बोजा कायम राहणार आहे. तसेच विकासकामांसाठी जो निधी आला आहे, तो निधी अशा पद्धतीने वीजबिले भरण्यासाठी वापरला गेला तर प्रत्येक गावामध्ये विकासकामे कशी करायची, हा प्रश्न निर्माण होणार आहे.
थकित वीजबिलापोटी वीज कंपनीने प्रत्येक गावातील सार्वजनिक वीज पुरवठा पूर्णपणे बंद केल्याने गावागावांमध्ये अंधार पसरलेला आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच परिषदेतर्फे आंदोलनाचा इशारा दिला होता, शुक्रवारी साताऱ्यातील पोवई नाक्यावर जिल्ह्यातील सरपंच जमले होते. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा जात असतानाच पोलिसांनी कोविडचे कारण पुढे करून मोर्चा अडवला. मोर्चात केवळ पंचवीस लोकांनाच परवानगी आहे, एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा काढता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तोडलेली वीज पुन्हा जोडावी, अशी मागणी केली. वीज जोडणी पुन्हा केली नाही तर सरपंच आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनामध्ये सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष आनंद जाधव, उपाध्यक्ष अरुण कापसे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोकळे, समन्वयक महेश गाडे, महिला समन्वयक अरुणा जाधव, सचिव शत्रुघ्न धनावडे यांच्यासह तालुका पदाधिकारी व सरपंच सहभागी झाले होते.
फोटो ओळ : सातारा येथील पोवई नाका येथे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष आनंद जाधव यांच्यासह सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कंदील आंदोलन केले.