खंडाळा : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर खंडाळा तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीच्या पहिल्याच मासिक सभेत सरपंचांच्या दडपशाहीच्या धोरणाविरोधात निषेध करीत विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
याबाबत खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , बावडा ग्रामपंचायतीची नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच मासिक सभा दि. १५ फेब्रुवारी रोजी सरपंच गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच सदस्यांचे स्वागत केल्यानंतर विषय पत्रिकेवरील विविध विषयांचे वाचन करून चर्चा सुरू झाली. त्यावेळी सर्व विषयांच्या चर्चेचे प्रोसिडिंग सभेतच पूर्ण करण्याची मागणी विरोधी सदस्य अतुल पवार यांनी केली. मात्र सरपंचांनी प्रोसिडिंग आमच्या पद्धतीने पूर्ण करू असे सांगितल्याने सरपंचांच्या दडपशाहीच्या कारभाराविरोधात अतुल पवार, योगेश राऊत, प्रतिमा पवार, शैलजा माने, वनिता पवार या पाचही विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. तसेच ग्रामपंचायतीने घेतलेले सर्व विषयांची चर्चा पुढील बैठकीत घेऊन पुन्हा सर्वानुमते मंजुरी घ्यावी अशीही मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली.
(कोट)
बावडा ग्रामपंचायतीत विरोधी सदस्यांचा आवाज दाबून लोकशाहीला धक्का पोहचविला जात आहे. कामकाजात विरोधी सदस्यांना विश्वासात न घेणे म्हणजे लोकांच्या मताचा अपमान आहे. या विरोधात आम्ही न्याय मागणी केली आहे.
- अतुल पवार, ग्रामपंचायत सदस्य