वडूज : ‘समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या उदात्त हेतूने अखंड कार्य करत राहिले तर आपल्याला उर्वरित आयुष्यात समाधानी जीवन जगता येते. येरळवाडीचे सरपंच योगेश जाधव यांनी आपल्याला मिळणाऱ्या मानधनातून गरजूंना जीवनावश्यक वस्तू भेट देऊन तालुक्याला एक नवा आदर्श दिला आहे. समाजाप्रति ऋणमुक्तीचा सरपंचांचा हा अनोखा उपक्रम स्तुत्य आहे,’ असे मत तहसीलदार किरण जमदाडे यांनी व्यक्त केले.
येरळवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती संदीप मांडवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, माजी सरपंच सदाशिव बागल, डॉ. संतोष मोरे, बाळासाहेब पोळ आदी उपस्थित होते.
गावचे भूमिपत्र सतीश इनामदार व नंदकुमार इनामदार यांनी सांगली येथील रिलायन्स फाऊंडेशन यांच्या माध्यमातून निराधार महिलांना व दिव्यांगाना मदतीचा हात दिल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी माजी सभापती संदीप मांडवे, धनंजय क्षीरसागर, प्रशांत जाधव, डॉ. संतोष मोरे आदींनी मनोगत व्यक्त केले. नाना जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब पोळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक नवनाथ कणसे, अनिल चव्हाण, भूषण देसाई, नवनाथ जाधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
३१ वडूज
फोटो : येरळवाडी ग्रामस्थांना तहसीलदार किरण जमदाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मालोजीराव देशमुख, सरपंच योगेश जाधव उपस्थित होते.