मल्हारपेठ : येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत अधिकाऱ्यांच्या चालढकलीमुळे शेतकऱ्यांची पीक कर्जे दोन-दोन महिन्यांपासून रखडलेली आहेत. वारंवार चकरा मारूनही बघतो-करतो, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. अगोदरच विविध संकटांमुळे शेतकरी अडचणीत असताना, बँकेतूनही अडवणूक होत असल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
विहे-शेडगेवाडीतील शेतकऱ्यांनी १६ जानेवारी रोजी पीक कर्जासाठी बँकेत प्रकरण दिले. दररोज एक-एक कागद, सह्यांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली तसेच लगेच प्रकरण करून देतो, असे सांगून वेळोवेळी विविध कागदपत्रे मागवून घेतली. कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर फेरफार आणण्यास सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी पाटण तहसील कार्यालयात फेऱ्या मारल्यानंतर फेरफार मिळाले. त्यानंतर कऱ्हाडमधील वकिलांना भेटण्यास सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी वकिलांचीही भेट घेतली. मात्र, संपूर्ण फेरफार असल्याशिवाय आम्ही रिपोर्ट देऊ शकत नाही, असे वकिलांनी सांगितले. त्यावर नंतर आठ दिवसांपूर्वी बँकेच्या शाखेत येऊन संबंधित अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली. उपलब्ध असलेल्या फेरफारवर जेवढे मिळेल तेवढे कर्ज द्या, अशी विनंती केली असता, बँकेचे कृषी मार्गदर्शक व व्यवस्थापक यांनी बँकेचा संप आहे, बुधवारी कर्जाची रक्कम देतो, असे सांगितले. मात्र, बुधवारी बँकेत गेल्यानंतर व्यवस्थापकांनी तुम्हाला फेरफार नसल्याने ठराविक कर्ज देतो, अजून कर्ज मंजूर नाही, इतर कामे असल्याने वेळ लागेल, फोन करून बोलवतो, असे सांगितले.
पीक कर्जाचे पैसे वेळेवर मिळत नसतील, तर शासनाने शेतकऱ्यांसाठी फसव्या योजना कशासाठी काढायच्या. बँकेचे अधिकारी दररोज फोन करतो, बचत गटाचे कर्ज वाटप सुरू आहे, मार्च एण्डची कामे चालू आहेत, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
- कोट
दोन महिन्यांपूर्वी बँकेत कागदपत्रे दिली आहेत. कामधंदा सोडून फेरफारसह इतर कागदपत्रे गोळा केली. बँकेतील अधिकारी एक एक कागद दररोज मागत आहेत. दोन महिने झाले, तरी पीक कर्ज मंजूर नाही. उडवाउडवीची उत्तरे देते आहेत. संबंधितांनी चौकशी करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
- कुसूम साळुंखे,
शेतकरी, विहे-शेडगेवाडी