- नितीन काळेल सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून साताऱ्यातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उतरवले आहे. यामुळे 'लोकमत'चे वृत्त खरे ठरले आहे. तर सोमवार दि. १५ एप्रिल रोजी शिंदे हे मोठ्या शक्ती प्रदर्शनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार आहेत.
महाविकास आघाडीत पूर्वीपासूनच सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाकडे आहे. पण या मतदारसंघाचा उमेदवार ठरवताना शरद पवार यांना वेळ लागला आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरून माघार घेतली. त्यामुळे निवडणूक लढवणार कोण हा प्रश्न होता. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात येऊन बैठक घेतली. तसेच उमेदवारासंदर्भात चाचणी केली. या घडामोडीतील चर्चेनंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे नाव अग्रभागी होते. त्यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार हे ' लोकमत ' ने दोन दिवसापूर्वीच वृत्त दिले होते. हे वृत्त आता खरे ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी सकाळी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये साताऱ्यातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उतरवले आहे.
साताऱ्याचा उमेदवारीचा तिढा सुटला आहे. आता दि. १५ एप्रिल रोजी माजी मंत्री शिंदे हे साताऱ्यात उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासाठी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि इंडिया आघाडीतील नेते उपस्थित राहणार आहेत.
शशिकांत शिंदेच का ? सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्या पाठीशी नेहमीच भक्कमपणे उभा राहिला. १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर साताऱ्यानेच पवार यांना मोठे बळ दिले. तेव्हापासून राष्ट्रवादीचा सातारा हा बालेकिल्ला ठरला. त्याचवेळी शशिकांत शिंदे हे तत्कालीन जावळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून प्रथम निवडून आले. २००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शरद पवार यांनी शिंदे यांना कोरेगावमधून उतरवले. दोनवेळी ते कोरेगावचे आमदार झाले. आघाडी सरकारच्या काळात त्यांना शरद पवार यांनी पालकमंत्रीही केले. शरद पवार यांचे विश्वासू अन् आक्रमक चेहरा म्हणून त्यांना पाहिले जाते. आज जिल्ह्यातील शरद पवार गटाची भक्कम बाजू तेच सांभाळत आहेत. राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर जिल्ह्यात पक्ष पुढे न्यायचं असेल तर आक्रमक चेहरा व विश्वासू नेता हे नेतृत्व गुण पाहून शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.