अंगापूर : वर्णे (ता. सातारा) येथील सुपुत्र जवान नायब सुभेदार श्रीमंत काळंगे यांना वर्णेसह परिसरातील उपस्थितांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.
श्रीमंत सुरेश काळंगे (वय ४२) हे सियाचीन येथे सैन्यदलातील बारा मराठा लाइट इंफन्ट्री बटालियनमध्ये एनएसजी कमांडोमध्ये नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. शुक्रवारी पहाटे त्यांचे अल्पशा आजाराने सियाचीन येथे उपचारादरम्यान निधन झाले. ही वार्ता समजताच कुटुंबासह गाव शोकसागरात बुडाला. काळंगे यांचे पार्थिव सकाळी साडेसात वाजता गावात आले. पार्थिव अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात आले. पार्थिव पाहताच आई यशोदा, पत्नी वैशाली, मुलगा सुजित व सचिन, भाऊ विनायक व लक्ष्मण या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्यानंतर पार्थिव फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत ठेवण्यात आले. अंत्ययात्रा दरम्यान पार्थिवावर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी फुलांची वृष्टी केली. अंत्ययात्रेदरम्यान श्रीमंत काळंगे यांच्या नावाचा जयघोष होत होता. भारत माता की जय, जबतक सूरज चाँद रहेगा, तबतक श्रीमंत तेरा नाम रहेगा.., वंदे मातरम, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
स्मशानभूमीत पार्थिवावर १२ बटालियनचे सुभेदार एस. एस. शिखरे, सैनिक कल्याण कार्यालयाचे ऑडनरी कॅप्टन गोरखनाथ जाधव, प्रशासनाच्यावतीने नायब तहसीलदार सुनील मुनाळे, बोरगावचे सहायक पोलीस निरीक्षक डाॅ. सागर वाघ, धनंजय शेडगे, विश्वास शेडगे, संतोष कणसे, सरपंच विजय पवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
चौकटः
कुटुंबाला मोठी सैनिकी परंपरा....
काळंगे यांचे आजोबा दिवंगत सखाराम हरी काळंगे यांनी ब्रिटिश अमदानीच्या काळात गावात सैन्यभरती आणली होती. गावाबरोबर मुलांना सैन्यात भरती केले होते. त्यांचाच वारसा श्रीमंत काळंगे चालवत होते. त्यांचे दोन बंधू विनायक व लक्ष्मण, तर मुलगा सचिन सैन्यदलात आहेत.
फोटो २६अंगापूर
वर्णे येथे जवान श्रीमंत काळंगे यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पार्थिवावर विविध मान्यवरांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून अखेरचे दर्शन घेतले. (छाया : संदीप कणसे)