अनिकेत गाढवे -पसरणी --पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि त्याच्या पायथ्याला असणाऱ्या धोम धरण परिसरात दरवर्षी जोरदार पावसाची हजेरी असते; मात्र यंदा पावसाने या भागातच दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. गतवर्षी या महिन्यात धोम-बलकवडी धरण शंभर टक्के भरले होते. यंदा पावसानेच अवकृपा केल्याने दोन्ही धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे.वाई तालुक्यातील पसरणी, चिखली, बोरगाव, आकोशी, वाशिवली, आसरे अशा व आजूबाजूंच्या गावातील शेतकऱ्यांची सोयाबीन, भात, बटाटा, घेवडा, भुईमूग अशी पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. पावसाच्या आगमनाच्या महिन्यात आठ दिवस पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यावरच पेरणी झाली. सर्व खरिपाची पिके चांगली आली. मात्र, पिकांना ज्यावेळी खरंच पाण्याची गरज होती त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना कृषिपंप सुरू करून आपल्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय आहे, ते आपल्या पिकांना पाणी सोडत आहेत. मात्र, ज्यांना पाणी सोडण्याची व्यवस्था नाही, त्या शेतकऱ्यांना आपली वाळत चाललेली पिके पाहण्यावाचून काही पर्याय उरलेला नाही. एकीकडे शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकाच्या बियाण्यांचे दर खूप महाग होते. त्यात रासायनिक खते, मजुरी, मेहनत आदीचा खर्च पाहता उत्पन्न तर नाहीच; पण शेतीसाठी झालेला खर्चही निघणार नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे. धोम धरणाची पाण्याची पातळी खालावली आहे. धोम जलाशयातून अनेक उपसा सिंचन योजना प्रकल्प आहेत. मात्र, यंदा पाण्याची पातळी अजून खालीच असल्याने कृषिपंपाद्वारे पाणी शेतापर्यंत पोहोचविण्यात अनेक अडचणी येत आहेत.सर्वच पिकांना फटका...वाई तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे दरवर्षी पाऊस पडणारे ठिकाण. पण, यंदा या परिसरात पाऊस कमी झाला आहे. जून महिन्यात सुरूवातीला काही पाऊस झाला. त्यानंतर पावसाने हुलकावणीच दिली आहे. सध्या या परिसरात भात, सोयाबीन, घेवडा अशी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. ही पिके चांगल्याप्रकारे उगवूनही आली आहेत. पण, पावसाने दडी मारल्याने या पिकांना पाणी कसे मिळणार या विवंचनेत येथील शेतकरी आहे. काही शेतकरी विहिरीतील पाण्यावर पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पावसाच्या माहेरात पिकांना सासुरवास!
By admin | Published: September 04, 2015 8:25 PM