अंगापूर : सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत व संवेदनशील असणाऱ्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या अंगापूर वंदन, चिंचणेर वंदन व फडतरवाडीत सत्तांतर झाले आहे. निगडी तर्फ सातारा, तासगांव,वर्णे ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांना सत्ता कायम राखण्यात यश आले आहे.
सातारा तालुक्यातील परंतु कोरेगांव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या तासगाव मंडलातील राजकीयदृष्ट्या मोठ्या ग्रामपंचायतीवर कोणत्या गटाचे वर्चस्व राहणार या चर्चांना उधाण आले होते. या परिसरातील अंगापूर वंदन, वर्णे, तासगाव, चिंचणेर वंदन, निगडी तर्फ सातारा, फडतरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक चर्चेत राहिली होती. या भागावर खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचाराचे प्राबल्य राहिले आहे. मात्र, सव्वा वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या घडामोडीच्या बदलांचा परिणाम या भागावर झाल्याचे दिसून आला. या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. महेश शिंदे यांच्या गटाचा उदय झाला. त्यामुळे परिसरातील या ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व राहणार अशा जोरदार चर्चा तालुक्यात व कोरेगाव विधानसभा मतदार संघात रंगल्या होत्या. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या वर्चस्वासाठी आमदार महेश शिंदे व आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रचाराच्या रणधुमाळीने व अनेक आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळले होते. अटीतटीच्या निवडणुकीत अंगापूर वंदन ग्रामपंचायतीवर आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाचे माजी सभापती नारायण कणसे, हणमंतराव कणसे, संतोष कणसे, जयसिंग कणसे यांच्या नेतृत्वखाली लढलेल्या एवार्जीनाथ ग्रामविकास पॅनेलने सर्वच्या सर्व ११ जागा जिंकल्या.
वर्णेमध्ये भैरवनाथ अजिंक्य संयुक्त पॅनेलने ११ जागा जिंकून सत्ता कायम राखली आहे. निगडी तर्फ सातारा ग्रामपंचायत निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने ६ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली आहे. तर विरोधी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने ३ जागा जिंकल्या आहेत. फडतरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत अजिंक्य पॅनेलने सत्ता परिवर्तन करीत सर्वच्या सर्व सात जागा जिंकून विरोधी नवसरीमाता पॅनेलला धक्का दिला आहे. या सर्व ग्रामपंचायतीवर आमदार शशिकांत शिंदे व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाचे वर्चस्व असल्याचे समजले जाते. चिंचणेर वंदन ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून तेथे रयत विकास पॅनेलने ८ जागा जिंकत सत्तांतर केले. तर विरोधी जानाईदेवी पॅनेलला एक जागा मिळाली आहे. तासगाव ग्रामपंचायतीने आपली सत्ता कायम ठेवली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक माजी उपसभापती विजय काळे व अन्य प्रमुखाच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भैरवनाथ अजिंक्य पॅनेलने आठ जागा जिंकून सत्ता कायम ठेवली आहे. तेथे विरोधी सिध्देश्वर ग्रामविकास पॅनेलला २ जागा तर एक जागा बिनविरोध झाली होती. या दोन ग्रामपंचायतीवर खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांना माणणाऱ्या गटाचे वर्चस्व राहिले आहे.
चौकट
गेल्या पाच वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीत होते. तेव्हा याच विचाराच्या परंतु, गावांअतर्गत दोन गटांत ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. यातून एक गट सत्तेत तर दुसरा विरोधी अशी परस्थिती होती. मात्र, सव्वा वर्षापूर्वी राजकीय समीकरणे बदलली व त्याचा फायदा आमदार महेश शिंदे यांना झाला. मात्र, आताच्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून भविष्यातील निवडणुकीत कोणाला फायदा होईल अशी चर्चा होत आहेत.