वाठार स्टेशन/ सातारा : वॉटर कप स्पर्धेत समाधानकारक कामगिरी बजावलेल्या कोरेगाव तालुक्यातील रुई गावात बुधवारी वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने एका तासात तब्बल ४१ शेततळी आणि सीसीटी भरून ओढ्या, नाल्यात पाणी साठल्याने ग्रामस्थांनी या पाण्यात उतरून आंनदोत्सव साजरा केला.वॉटर कप स्पर्धेत श्रमदानातून या गावाने मोठे काम पूर्ण केले. या कामाचे मोजमाप दोन दिवसांपूर्वी कमिटीकडून झाल्यानंतर बुधवारी वीस वर्षांनंतर एक तास मुसळधार पाऊस पडला.
या पावसामुळे ४५ दिवसांत गावकऱ्यांनी श्रमदानातून साकारलेले ३६ लहान शेततळी पूर्ण तर पाच मोठी शेततळी अशी एकूण ४१ शेततळी भरली तर सर्व सीसीटीमध्ये पाणी साठले.
या पाण्याने या गावात ग्रामस्थांनी शेततळ्याच्या पाण्यात उतरून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामस्थांनी ४५ दिवसांत घेतलेल्या श्रमाला वरुणराजा पावला, अशीच स्थिती ग्रामस्थाच्या आनंदातून दिसत आहे.