सातारा : जिममध्ये आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिम ट्रेनरवर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामसिंग असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित जिम ट्रेनरचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका जिममध्ये रामसिंग हा ट्रेनर आहे. त्या जिममध्ये एक सतरावर्षीय अल्पवयीन मुलगी व्यायामासाठी जात होती. दि.२ मे रोजी सकाळी १० वाजता संबंधित पीडित मुलगी जिमला गेली होती. त्यावेळी जिम ट्रेनर रामसिंग याने पीडितेला ऑफिसमध्ये बोलावून घेऊन ‘तुझे फॅट्स वाढलेले आहेत’, असे बोलून चुकीचा स्पर्श केला, तसेच पीडितेला चेंजिंगरूमपर्यंत ढकलत नेले. त्यानंतर त्याने तिच्याशी गैरकृत्य केले. या प्रकाराची माहिती पीडितेने तिच्या घरातल्यांना सांगितल्यानंतर तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी रामसिंगवर विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल केला. महिला पोलिस उपनिरीक्षक मोटे या अधिक तपास करीत आहेत.गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘तो’ पसार
जिमट्रेनर रामसिंगवर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी फिल्डिंग लावली. मात्र, तो सध्या साताऱ्यातून पसार झाला आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात प्रयत्न सुरू केले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे न्यायालयात तो अटकपूर्व जामीन घेण्यासाठी आल्यानंतर त्याच्यावर पोलिस लक्ष ठेवून असणार आहेत. महिला पोलिस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. साताऱ्यात जिमला जाणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे या प्रकरणाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.