सातारा : सातारा-सज्जनगड रस्त्यावर पोगरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या जीपने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाला तर दुसरा एकजण जखमी झाला. विकास चंद्रकांत जाधव असे मृताचे नाव असून, गावी तो आजारी आईची सेवा करण्यासाठी आला होता.याबाबत समजलेली माहिती अशी की, कुरूण, ता. सातारा येथील विकास जाधव (वय ३२) हा मुंबईत कामाला आहे. गावी असणाऱ्या आईच्या सेवेसाठी १५ दिवसांपूर्वी तो आला होता. बुधवारी रात्रीच्या सुमारास साताऱ्यातून तो गावातीलच मित्राबरोबर दुचाकीवरून परतत होता.
यादरम्यान, सातारा-सज्जनगड रस्त्यावरील पोगरवाडी फाट्यानजीक समोरून आलेल्या जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरुन पडून विकास जाधव हा गंभीर जखमी झाला.
त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला प्रदीप बाबूराव देशमुख (२५) हा जखमी झाला. जखमी प्रदीपवर जिल्हा रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.मुंबईला जाण्यापूर्वी काळाचा घाला...वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबप्रमुख म्हणून विकासवर सर्वांचीच जबाबदारी आली होती. उदरनिर्वाहासाठी मुंबईला जाऊन तो नोकरी करत असलातरी त्याचे लक्ष गावाकडे आई आणि लहान भावांवर होते. त्यासाठी तो वारंवार गावी यायचा.
गेल्या आठवड्यात आई आजारी असल्याने व लग्नासाठी मुली पाहायच्या म्हणून तो सुटी घेऊन गावी आला होता. आईचे आॅपरेशन झाल्याने शनिवारी तो मुंबईला जाणार होता. तर बुधवारी रात्री तो एका भावाला मुंबईला सोडण्यासाठी सातारा येथे आला होता. त्यावेळी तेथून येताना प्रदीप देशमुखबरोबर तो दुचाकीवरून गावी येत असताना हा अपघात झाला.