सातारा : राज्यातील अंगणवाडीतार्इंचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६५ करण्यात येऊनही तसा आदेश न निघाल्याने संघटना आक्रमक झाल्या होत्या. एक एप्रिलला एक दिवस बाकी असताना शनिवारी महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी पत्र काढले आहे. त्यामध्ये शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत सेविकांची मानधनी सेवा समाप्त करण्यात येऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे. असे असले तरी शासनाचा अध्यादेश दुपारपर्यंततरी निघाला नव्हता. सध्यस्थितीत मात्र, अंगणवाडीतार्इंची सेवा राहिली आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० केल्यानंतर कर्मचारी व विरोधी पक्षाने सरकारवर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधिमंडळात ६५ वयोमर्यादा कायम ठेवण्याची घोषणा केली. मात्र, यासंबंधीचा अध्यादेश किंवा पत्र बुधवारपर्यंततरी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले नव्हते.
त्यामुळे एक एप्रिलला अवघे तीन दिवस शिल्लक असताना राज्यातील १० हजारांहून अधिक अंगणवाडीतार्इंच्या जीवाला घोर कायम राहिला होता. त्यानंतर अंगणवाडी संघटना आक्रमक झाल्या. त्यातच गुरूवार आणि शुक्रवार सुट्टी असल्याने संघटनेने शनिवारी एकात्मिक बालविकास विभागाचे सचिव आणि मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार संघटनेचे पदाधिकारी शनिवारी मुंबईला गेले आहेत. त्यांनी सचिवांची भेट घेतली.
त्यानंतर सचिवांनी पत्र काढले आहे. त्यामध्ये एक एप्रिल रोजी वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. त्यामध्ये पुढील पाच वर्षांसाठी मानधनी पदावर त्या काम करण्यास पात्र आहेत का याबाबत सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांना सेवेत ठेवण्यात यावे किंवा कसे याचा निर्णय लवकरच मंत्रीमंडळाच्या मान्यतेने घेण्यात येणार आहे.
त्यामुळे एक एप्रिलला वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या सेविका, मतदनीस यांना शासनाचा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत त्यांची मानधनी सेवा समाप्त करु नये अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाचा अध्यादेश येईपर्यंततरी ६० वर्षे पूर्ण झालेल्या अंगणवाडीताई कामावर राहणार आहेत. या पत्रामुळे सातारा जिल्ह्यातील २९५ कर्मचाऱ्यांबरोबरच राज्यातील सुमारे दहा हजारांहून अधिक अंगणवाडीतार्इंची सेवा सध्यातरी कायम राहणार असल्याचे आशादायक चित्र आहे.