सातारा : मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती होती. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हे खड्डे मुजविण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून असणारे हे खड्डे मुजविल्याने वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.येथील चिपळूणकर बाग परिसरातील श्री दत्त मंदिर येथे वर्षभरापूर्वी केलेल्या डांबरी रस्त्यावर जलवाहिनीची गळती काढण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. दोन ठिकाणी त्यासाठी खड्डे खोदण्यात आले होते. प्रारंभी जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदण्याचे काम करण्यात येणार होते.
मात्र, स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या साह्याने काम करण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे ब्रेकरच्या साह्याने रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. गेले आठ दिवस रस्त्यावर तसेच खड्डे होते. हे काम पूर्ण कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
हे काम पूर्ण करण्यासाठी संबंधितांकडे विचारणाही करण्यात आली होती. कारण, हे खड्डे रस्त्यात असल्याने अपघाताची भीती होती. याबाबत लोकमतमध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते. अखेर आठ दिवसानंतर हे खड्डे मुजविण्यात आले आहेत.