सातारा : दडी मारल्यानंतर जोर धरलेल्या पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिल्याने पेरणी रखडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट आणखी गडद झाले आहे. तर धरण परिसरात पावसाने सोमवारपासून पाठ फिरवल्याचे दिसून आले.मान्सूनचे वेळेत आगमन झाले असताना सुरूवातीच्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला. दुष्काळी भागातही पाणी वाहिले. पण, त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे ढग दाटून आले. खरीप हंगामातील पेरणी वेळेत होणार का याकडे लक्ष लागले होते. त्यानंतर काही दिवसांच्या दडीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला.
धरण परिसरासह जिल्ह्याच्या पूर्व भागातही पावसाच्या सरी पडल्या. पण, दोन दिवसातच पावसाने पुन्हा दडी मारली. मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा ३ मिलीमिटर पाऊस झाला. तर सोमवारी सकाळपर्यंत येथे ३१ मिलीमिटर पाऊस झाला होता. तसेच जिल्ह्यातील इतर धरणक्षेत्रातही पाऊस उघडला आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व कंसात एकूण पाऊस
- धोम ०० ५३
- कोयना ०३ ३१०
- बलकवडी ०१ १४८
- कण्हेर ०१ ३४
- उरमोडी ०० ४३
- तारळी ०० ८३