सातारा : अदालत वाडा परिसरातील रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका इमारतीमध्ये मद्यपींनी धुमाकूळ घालून सात ते आठ जणांना मारहाण झाली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी रात्री उशिरा सातारा शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली.याबाबत हॉटेल व्यावसायिक वैभव जयवंत परदेशी (वय २९, बुधवार पेठ, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, अदालत वाडा परिसरात मोकळ््या जागेत अभिजित चंद्रकांत राजेमहाडिक (ढोल्या गणपती, माची पेठ), साईनाथ संभाजी पवार (पावर हाऊस, मंगळवार पेठ), बापू बबन सकटे (जकातवाडी, शहापूर), शांताराम कोंडीबा खरात (माची पेठ) आनंदा संभाजी सकटे (जकातवाडी), अक्षय पांडुरंग जगताप (माचीपेठ) हे सर्वजण दारू पिण्यासाठी बसले होते. त्यांनी नक्षत्र अपार्टमेंटमधील हॉटेलमधून पाण्याचा जग घेऊन गेले. हॉटेल बंद करण्याच्या वेळेस वैभव परदेशी याने त्या मद्यपींकडे पाण्याचा जग परत मागितला.या कारणावरून चिडून जाऊन मद्यपींनी वैभवला मारहाण केली. ती सोडविण्यासाठी आलेल्या अझहर आगा यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ते दोघे पळत नक्षत्र इमारतीमधील आपल्या घरात जात असताना मद्यपींंनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली.
दरम्यान, ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या चंद्रकात पवार व त्यांची पत्नी यांनाही शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच इतर रहिवाशांनाही मारहाण केल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन सहा मद्यपींना अटक केली. रात्री उशिरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास हवालदार जगदाळे करीत आहेत.